मालगाव येथे कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या | पुढारी

मालगाव येथे कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या

मिरज; पुढारी वृत्तसेवा : अवकाळीमुळे द्राक्षबागेचे नुकसान झाल्यामुळे कर्जफेडीच्या विवंचनेतून मालगाव (ता. मिरज) येथील जयहिंद सोसायटीचे माजी अध्यक्ष चिदानंद सातलिंग घुळी (वय 55) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

चिदानंद घुळी यांची मालगाव येथे सात एकर शेतजमीन आहे. यापैकी अडीच एकर द्रक्षबाग आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्षबागेला मोठा फटका बसला आहे. द्राक्षबागेसाठी त्यांनी कर्ज काढले होते. ते फेडण्यासाठी दोन एकर शेती देखील विकली होती. यावर्षीही त्यांनी द्राक्ष बागेसाठी सोसायटी व बँकेचे कर्ज घेतले होते. मात्र, अवकाळी पावसाने बागेचे पुन्हा मोठे नुकसान झाले.

त्यामुळे ते कर्जफेडीच्या विवंचनेत होते. त्यांना कर्ज दिलेल्यांनी वसुलीसाठी तगादाही लवला होता. यातून मंगळवारी दुपारी त्यांनी राहते घर आणि द्राक्षबागेच्या मध्यभागी असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घुळी जयहिंद विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष व गेली सात वर्षे संचालक होते. त्यांच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्‍त होत होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे

Back to top button