राहुल गांधींची मुंबईतील सभा अचानक रद्द; ठाकरे सरकारने ‘नकारघंटा’ दिल्याची चर्चा ! | पुढारी

राहुल गांधींची मुंबईतील सभा अचानक रद्द; ठाकरे सरकारने 'नकारघंटा' दिल्याची चर्चा !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर होणारी राहूल गांधी यांची नियोजित सभा रद्द करण्याचा आकस्मिक निर्णय मुंबई काँग्रेसने घेतला आहे.

सभेसाठी मैदानाची मागणी करणारी याचिकाही मंगळवारी तडकाफडकी मागे घेण्यात आली. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावामुळे सभा रद्द करावी लागली अशी सारवासारव मुंबई काँग्रेसकडून करण्यात येत असली तरी ओमायक्रॉनचे कारण देत राज्य सरकारकडून सभेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसावा ,अशी जोरदार चर्चा आहे.

काँग्रेसच्या स्थापना दिनी २८ डिसेंबर रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात सभा आयोजित करण्याचा मुंबई काँग्रेसचा मनोदय होता. राहुल गांधी यांनीही सभेसाठी येण्याचे मान्य केले होते. मात्र मंगळवारी अचानक सभा रद्द केल्याचा निर्णय मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.

सभेबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याशी चर्चा झाली होती का? ओमायक्रॉनचा प्रभाव वाढत आहे, त्यामुळे सभा आयोजित करू नका, असे यापैकी कोणी सांगितले का ? या प्रश्नावर् स्पष्ट उत्तर न देता, ओमायक्रॉनचा प्रभाव जगभर वाढत आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असे मोघम उत्तर दिले.

ऐनवेळी सभा रद्द करण्याच्या निर्णयामागे नेमकी वस्तुस्थिती काय? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना जगताप यांची अडचण झाली होती.

ऑगस्ट महिन्यात आम्ही सभेसाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. सभेसाठी सरकारने परवानगी नाकारली नव्हती. मात्र कोरोना आणि ओमायक्रोनचा आढावा घेतल्यानंतर संपूर्ण देशामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे जाणवल्याने आम्ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे सांगताना दुसरीकडे मात्र , ऑगस्टमध्ये सरकारकडून परवानगी मागितली होती. संबंधित खात्याला पत्रही दिले होते. परंतु सरकारकडून उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु नंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण जगताप यांनी दिले. यावरून राज्य सरकारने काँग्रेसच्या मागणीची दखल घेतली नाही, हेच उघड होत आहे.

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रभावाची जाण असतानाही सभेसाठी पार्कची मागणी करणारी याचिका करण्याचे कारण काय होते, न्यायालयात आजच याचिकेवर सुनावणी होणार असताना अचानक याचिका मागे घेण्याचे कारण काय, यावरही काँग्रेसने स्पष्ट काही सांगितले नाही. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सभेला परवानगी देता येणार नाही, असा संदेश सरकारकडून आल्याने सभा रद्द करण्याचा तडकाफडकी रद्द करण्याचा निर्णय मुंबई काँग्रेसला घ्यावा लागला, अशीच चर्चा आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button