सांगली येथील वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी ईरवंत यमलवाड यांना राजस्थान मधील परप्रांतीय कामगार उपमाराम जागडा याने मारहाण केली. येथील विश्रामबाग चौकात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. (Sangli RTO)
याबाबत जागडा याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस कर्मचारी ईरवंत यमलवाड यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले यमलवाड विश्रामबाग चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ड्युटीवर होते. त्यावेळी जागडा हा दुचाकीवरुन जात होता. त्याने मास्क न घातल्याने मास्क बाबत विचारले असता सरळ उत्तर दिले नाही. त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना मागितला. तोही त्याने दिला नाही. उद्धट बोलून यमलवाड यांच्या कॉलर धरून धक्काबुक्की केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.