Internal political movements in the BJP
उत्तर प्रदेश भाजपच्या हालचालींचे केंद्र Pudhari News Network
संपादकीय

उत्तर प्रदेश भाजपच्या हालचालींचे केंद्र

पुढारी वृत्तसेवा
उमेश कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तिसर्‍यांदा सत्तेत आली आहे. तिसर्‍यांदा सत्तेत आल्यावर सरकारने कामाला सुरुवात केली. त्याचबरोबर दुसरीकडे भाजपमध्ये अंतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या राजकीय हालचालींचे केंद्र उत्तर प्रदेश आहे, जिथे भाजपची सत्ता आहे. भाजपच्या या मोठ्या राजकीय हालचालींचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्यानंतर कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपचे नेतृत्व कोणाकडे येणार, यावरून दोन बड्या चेहर्‍यांमध्ये चुरस आहे. यातील एक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत; पण सध्याच्या राजकीय हालचालींमध्ये अमित शहा पडद्यासमोर नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये पक्षात अंतर्गत लढाई सुरू आहे. यामध्ये एका टोकाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ उभे आहेत, तर दुसर्‍या टोकाला उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आहेत; मात्र वास्तव हे आहे की, मौर्य हे केवळ एक चेहरा आहेत. खरे तर पडद्यामागे सर्व डावपेच केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा करत आहेत. केशवप्रसाद मौर्य हे केवळ प्यादे असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शहा स्वत: त्यांना पुढे करून योगींच्या ‘मठा’मध्ये व्यत्यय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अन्यथा योगी यांच्या तुलनेत केशवप्रसाद मौर्य यांची राजकीय उंची खूपच कमी आहे. योगी यांनी 1998 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी पहिली लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. योगी यांना एकाही निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. केशवप्रसाद मौर्य यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आतापर्यंत केवळ दोनच निवडणुका जिंकल्या आहेत. एक 2012 ची विधानसभा निवडणूक आणि दुसरी 2014 ची लोकसभा निवडणूक. अशा स्थितीत कोणाच्याही भक्कम पाठिंब्याशिवाय योगी यांच्या विरोधात जाण्याची ताकद त्यांच्यात आहे, यावर विश्वास बसणे कठीण आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यानंतर भाजपच्या राजकारणात सर्वात मोठे स्थान कोणाचे आहे, याबाबत भाजप आणि संघाचा मोठा वर्ग योगी यांच्या मागे असल्याचे बोलले जात आहे. अनेक प्रादेशिक नेतेही दबक्या आवाजात शहा यांचे नाव घेतात. उत्तर प्रदेशातील भाजपमधील अंतर्गत लढाईचे हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. खरे तर, 2017 मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन केल्यावर तेव्हा शहा प्रभारी सरचिटणीस होते. यादव समाजाव्यतिरिक्त अन्य छोट्या जातींना भाजपशी जोडण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत भाजपचा उत्तर प्रदेशातील वनवास संपला. तेव्हापासून शहा यांना भाजपचे चाणक्य म्हटले जाऊ लागले. शहा यांचे चाणक्य धोरण भाजपमध्येच नव्हे, तर काँग्रेसमध्येही मानले जाऊ लागले. शहा यांना त्या राज्याच्या नेत्यापेक्षा उत्तर प्रदेश अधिक कळतो, असे सांगण्यापर्यंत काँग्रेसचे नेते गेले आहेत. यानंतर राज्यवार विधानसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून शहा यांची प्रतिष्ठा वाढली. दरम्यान, उत्तर प्रदेशव्यतिरिक्त योगी यांची लोकप्रियता राष्ट्रीय स्तरावरही पसरू लागली.

योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातील माफियांविरुद्धची मोहीम अन्य राज्यांसाठी उदाहरण बनू लागली. योगी यांची प्रशासनावरची पकड आणि गुन्हेगार, माफियांविरुद्धची बुलडोझर मोहीम इतकी प्रभावी झाली की, भाजपशासित अन्य राज्यांत त्याचे अनुकरण होऊ लागले. यासोबतच भगवा परिधान केलेले योगी यांचे हात कोणत्याही प्रकारच्या भ—ष्टाचारापासून निष्कलंक राहिले. परिणामी, योगी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2022 मध्येही यश संपादन केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत योगी यांच्या राजवटीत भाजपने उत्तर प्रदेशात 62 जागा जिंकल्या होत्या; मात्र त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 33 जागा मिळाल्या आहेत. तेव्हापासून भाजपमध्ये योगी यांच्या विरोधात हालचालींना वेग आला आहे.

भाजपच्या पराभवाची समीक्षा हे केवळ निमित्त आहे. भाजपमध्ये पंतप्रधान मोदी यांचे निर्णय नेहमीच आश्चर्यकारक राहिले आहेत. त्यांनी एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना सरकारमधून काढून टाकले जात आहे. मोदी यांच्या या धोरणानुसार मुरली मनोहर जोशी, प्रकाश जावडेकर, थावरचंद गेहलोत या नेत्यांना सरकारमधून काढून संघटनात्मक कामात किंवा राज्यपालपदावर बसवले. पंतप्रधान मोदीही 2025 मध्ये 75 वर्षांचे होतील. त्यांची लोकप्रियताही पूर्वीसारखी राहिलेली नाही. या स्थितीत पंतप्रधानपदावर नवा चेहरा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2027 मध्ये पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रपतिपदासाठी निवड होणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. काहीही झाले, तरी उत्तर प्रदेशच्या राजकारणात योगी यांचा मठ अजूनही सुरक्षित आहे, ही एक गोष्ट स्पष्ट होते. भाजपच्या अंतर्गत लढाईला सामोरे जाण्याची क्षमता संघामध्ये आहे. नुकतेच संघप्रमुख मोहन भागवत यांनी एका वक्तव्यात भाजपमधील सुरू असलेल्या भांडणावर निशाणा साधला आहे. झारखंडमधील गुमला येथे भागवत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रगतीचा अंत नसतो. माणसाला आधी सुपरमॅन, नंतर देवता आणि नंतर देव बनायचे असते; पण आता संपले असे समजू नये. त्यांनी सतत काम करत राहावे. कारण, विकासाला अंत नाही, असे भागवत म्हणाले होते. आगामी काळात संघ आणि भाजपची बैठक होणार आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा-बसपाला टक्कर देण्यासाठी भाजपकडे दुसरा कोणताही मजबूत ओबीसी किंवा दलित चेहरा नाही, हे चित्र स्पष्ट होईल. अशा परिस्थितीत हिंदुत्व हे एकमेव शस्त्र आहे, ज्याच्या मदतीने राज्यातील राजकारण लढवता येते. त्यामुळे सध्या तरी योगी यांना भाजपकडे पर्याय दिसत नाही.

SCROLL FOR NEXT