इराणमध्ये सुधारणांचे वारे

डॉ. मसूद पेझेश्कियान यांना इराणच्या नेतृत्वाची संधी
इराणमध्ये सुधारणांचे वारे आहे.
इराणमध्ये सुधारणांचे वारे आहे.pudhari1
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

अब्राहम रईसी यांच्या निधनामुळे इराणमध्ये अचानकपणाने घ्याव्या लागलेल्या निवडणुकांमध्ये अनपेक्षित निकाल समोर आल्याने आखातासह जगालाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या निवडणुकीत पुनरुज्जीवनवादी आणि नवनिर्माणवादी यांच्यातील विचारयुद्ध रंगले होते; पण शेवटी सुधारक विचाराने नवविचारांचा जागर घडवून आणला आणि डॉ. मसूद पेझेश्कियान यांना इराणच्या नेतृत्वाची संधी मिळाली.

प्रगत समाज विज्ञान-तंत्रज्ञानाला, प्रसार माध्यमांना सामोरे जातो तेव्हा तेथील जीवनशैली व विचार पद्धती बदलते. 1960-70 या दशकात नभोवाणी व दूरचित्रवाणी या माध्यमांना सामोरे गेल्यानंतर इराणचे चित्र संपूर्णपणे बदलले. तेथे आधुनिक विचार रुजविले जाऊ लागले. ‘पासिंग ऑफ ट्रॅडिशनल सोसायटी’ या ग्रंथामध्ये डॅनियल लर्नर यांनी इराणमधील सनातनी समाज नव्या माध्यमांमुळे कसा बदलला, याचे साधार विवेचन केले आहे. मध्यंतरीच्या काळात आयातुल्ला खामेनी यांच्या प्रभावामुळे इराणमध्ये पुराणमतवादी विचारांचा प्रभाव पडला होता. तथापि, ताज्या निवडणुकीमध्ये इराणमध्ये पुन्हा एकदा सुधारणावादी विचारांचा पगडा दिसून आला. हे सर्व घडले त्यामागे डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी केलेल्या पद्धतशीर व सुसूत्र प्रचाराचे यश दिसून येते. त्यांनी राजकीय मोहीम यशस्वीपणे चालविली. त्यांच्या कन्येनेही हिजाबविरोधात मोठी मोहीम आखली व त्याला इराणमधील तरुणवर्गाने चांगला प्रतिसाद दिला. या निवडणुकीतही पुनरुज्जीवनवादी आणि नवनिर्माणवादी यांच्यातील विचारयुद्ध रंगले आणि शेवटी सुधारक विचाराने नवविचारांचा जागर घडवून आणला.

मुळात इराणच्या 20 निवडणुका गाजल्या त्या पुराणमतवादी आणि सुधारक विचारातील तुंबळ रणसंग्रामामुळे. सुधारक विचारांचे नेते मसूद पेझेश्कियान यांनी देशामध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याचे आणि देशाची सर्वांगीण प्रगती करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला इराणी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जगातील प्रमुख देशाच्या नेत्यांनी नूतन अध्यक्षांचे त्यांच्या देदीप्यमान विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. नव्या जगासाठी इराणची दारे खुले करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. आता जनतेला दिलेली आश्वासने नवे अध्यक्ष किती पूर्ण करतील, हा खरा प्रश्न आहे. कट्टरपंथीय सईद जलिली यांचा पराभव करून त्यांनी इराणचा राजकीय प्रवाह बदलून टाकला आहे. त्यांच्या विजयाचे इराणच्या राजकारणावर व समाजकारणावर काय परिणाम होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एक आण्विक करार करून इराणवरील पाश्चात्त्य राष्ट्रांचे निर्बंध संपुष्टात आणू शकतो, असे अभिवचन या निवडणुकीत डॉ. मसूद यांनी दिले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभल्याचे निकालातून दिसून आले आहे. येणार्‍या काळात निवडणूक काळात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आव्हान त्यांना पेलायचे आहे. इराणमध्ये खामेनींचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे तेथे काहीशी संघर्षस्थिती उद्भवण्याचीही शक्यता अहे. याखेरीज कायदा- सुव्यवस्थेचाही प्रश्न आहे. इराणच्या पोलिस दलाचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मोरालिटी पोलिस यंत्रणेवर डॉ. मसूद यांनी बरीच टीका केली होती. प्रशासकीय सुव्यवस्था, लोककल्याणकारी योजनांची आखणी, महिलांच्या शिक्षण व विकासासाठी नव्या कार्यक्रमांचे सूत्रबद्ध कार्यान्वयन यावर त्यांना भर द्यावा लागेल. इराणच्या लोकशाहीत राष्ट्राध्यक्ष हे लोकांच्या मतदानातून थेट निवडले जात असल्यामुळे ते दुसर्‍या सर्वोच्च स्थानावर असतात. सरकारचा दैनंदिन कारभार त्यांना चालवावा लागतो. तसेच देशांतर्गत व परराष्ट्र धोरणाला दिशा द्यावी लागते. सुरक्षेच्या बाबतीत त्यांचे अधिकार मर्यादित असतात. गृहमंत्री हे राष्ट्रीय पोलिस दलाचा कारभार पाहतात. इराणमधील चलन आणि शेअर बाजारातील घडामोडी पाहता निवडणूक निकालानंतरचे चित्र सकारात्मक असल्याचे दिसून येते.

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगला आदर्श त्यांनी निर्माण करावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. बदलणार्‍या जगात राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात महिलांना सहभागी करून घेतल्याशिवाय कुठलाही देश प्रगतीचा अंतिम टप्पा गाठू शकत नाही. त्यासाठी इराणमधील जनतेने दिलेला कौल महत्त्वाचा असून तो सर्व जगावर सकारात्मक परिणाम करू शकेल यात शंका नाही. डॉ. मसूद यांच्या काळात भारत-इराण संबंध अधिक भक्कम होतील आणि रईसींनी निधनापूर्वी केलेला चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा करार अबाधित राहून पुढेही अनेक विकास प्रकल्प भारताच्या मदतीने जोमाने मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news