Latest

चंद्रपूर : अवकाशातून कोसळलेल्या ‘त्‍या’ वस्तू सॅटेलाईट रॉकेटचे अवशेष

निलेश पोतदार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात शनिवारी ( दि. ३ ) रात्री आकाशातून कोसळलेल्या गोलाकार रिंग व व्हॉलीबॉलच्या आकाराचा गोळा ह्या वस्तू उल्का असाव्यात, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात हाेता;  परंतु त्या वस्‍तू उपग्रहाचे किंवा सॅटेलाईट रॉकेटचे अवशेष आहेत, असा प्राथमिक अंदाज स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला आहे.

आज (रविवार) प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता स्काय वाच ग्रुपच्या एका चमूने घटनास्थळी पाहणी केली. तसेच २ अवकाशीय वस्तूची पाहणी केली. लाडबोरी येथे पडलेली रिंग आणि व्हॉलीबॉलच्या आकाराची गोल वस्तू उपग्रह सोडण्यासाठी वापरले जाणारे रॉकेटचे अवशेष आहेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. प्रशासन तंत्रज्ञांचा चमू बोलावून त्या अवकाशीय वस्तूंची खात्री करावी आणि दोषी देश-संस्थावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्काय वाच ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे.

शनिवारी विदर्भातील काही ठिकाणी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अवकाशातून आगीचे गोळे जमिनीवर कोसळताना पाहिले होते. ही घटना उल्का वर्षावाशी जोडण्यात आली होती; परंतु स्काय वाच ग्रुपतर्फे हे तुकडे उपग्रहाचे किंवा रॉकेटचे असावेत, असा अंदाज व्यक्त केला होता. शनिवारी न्यूझीलंड देशाचे ब्लॅक स्काय नावाचा उपग्रह सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी अवकाशात सोडण्यात आला होता. ती वेळ आणि मार्ग पाहता हे त्यांचेच रॉकेटचे तुकडे असावेत, असा अंदाज व्‍यक्‍त हाेत आहे.

प्रा सुरेश चोपणे, प्रा सचिन वझलवार, प्रा योगेश दुधपचारे यांनी सिंदेवाही तालुक्यातील घटनास्थळाला भेट दिली.पहाणी केल्यानंतर सिंदेवाही पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेल्या अवकाशीय वस्तूंची त्‍यांनी पाहणी केली.

लाडबोरी या गावात पडलेला रॉकेटचा बाह्य पत्रा आणि पवनपार जवळ एक गोल आकाराचा हायड्रोजन स्पिअर हा इंधन दाब नियंत्रण करणारी गोल रिंग आढळली. अजूनही काही वस्तू परिसरात आढळण्याची शक्यता आहे. प्रा. सुरेश चोपणे आणि त्यांच्या चमूने केलेल्या निरीक्षणावरून या दोन्ही अवकाशीय वस्तू उपग्रहाच्या रॉकेटचा भाग आहेत, असा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. गोल रिंग १० बाय १० फूट व्यास, ८ इंच रुंद आणि ४० किलोची आहे ,तर दुसरी गोल वस्तू रॉकेटचाच एक भाग असून ती २ फूट व्यासाची आहे. अजून काही वस्तू परिसरात आढळून येण्याची शक्यताही वर्तविली आहे. प्रा. चोपणे आणि त्यांच्या चमुने लाडबोरी येथील नागरिकांशी या घटनेच्या अनुषंगाने संवाद साधला. त्यांनतर पोलीस प्रशासन महसुल प्रशासनाशी चर्चा करून अन्य ठिकाणी पडलेले तुकडे शोधून या घटनेचा सविस्तर अहवाल शासनाकडे तातडीने पाठविण्याची विनंती केली आहे.

संबंधीत देश अथवा अवकाश संस्थांवर दंडात्मक कारवाई करावी : प्रा.चोपणे

सिंदेवाही तालुक्यातील महसुल आणि जिल्हा प्रशासन परिसरातील सर्व संभाव्य वस्तू गोळा करून सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविणार असून, पडलेल्या वस्तूंची पाहणी आणि ओळख करण्यासाठी तंत्रज्ञांचा चमू बोलविणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्कॉय गृपच्या वतीने मिळालेल्या पुराव्याच्या आणि निरीक्षणाच्या आधारे शासन, प्रशासन , इस्रो आणि न्यूझीलंडच्या अवकाश संस्थेला माहिती देण्यात येणार आहे.

अशा रॉकेट पडल्याच्या घटना जगात क्वचितच घडतात. कारण बहुदा हे भाग समुद्रात पडावेत किंवा निर्मनुष्य ठिकाणी पडावेत अशा बेतानेच सोडले जातात; परंतु तंत्रज्ञांनाच्या आणि मानवी चुकीने क्वचित मानवी वस्तीत हे भाग पडतात. लाडबोरी गावात अगदी सभोवताली घरे असताना अगदी त्यांच्या मधोमध मोकळ्या जागेत ५० किलो वजनाची तप्त रिंग पडली आणि फार मोठा अनर्थ ( प्राणहानी आणि वित्तहानी) घडता- घडता टळला. अन्यथा तेथील घरे जळून प्राणहानी झाली असती. ह्या घटनेची प्रशासनाने चौकशी करून संबंधीत देश आणि अवकाश संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आम्ही स्काय वाच ग्रुपच्या वतीने केली आहे.

प्रा.सुरेश चोपणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT