Cheer girls : पुण्यात बैलगाडा शर्यतीत नाचल्या मराठमोळ्या चिअर गर्ल्स | पुढारी

Cheer girls : पुण्यात बैलगाडा शर्यतीत नाचल्या मराठमोळ्या चिअर गर्ल्स

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा : न्यायालयीन बंदीनंतर काही वर्षांनी सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतींचा आता ग्रामीण भागात धुरळा उडत आहे. बैलगाडा मालकांबरोबर आयोजकांमध्येसुद्धा उत्साहाचे वातावरण आहे.  पांगरी, (ता. खेड) येथे आयोजकांनी शर्यतीचा उत्साह वाढवा, या हेतूने चिअर गर्ल्स (Cheer girls) आणून शर्यतीत रंगत आणली. बैलगाडा शौकिनांनी याचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला यानंतर त्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे.

पांगरी येथे शनिवारी (दि २) श्री रोकडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. ग्रामस्थांनी त्यासाठी लोकवर्गणी जमा करून मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयाेजन केले. या सर्वांचे प्रमुख आकर्षण ठरले ते बैलगाडा घाटातील चिअर गर्ल्सची  (Cheer girls) उपस्थिती. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ घालून स्वतंत्र व्यासपीठावरून चिअर गर्ल्सनी पहिल्या क्रमांकात येणाऱ्या बैलगाड्याला चिअर केले. क्रिकेटमध्ये चौकार, षटकार झाला की, जशा चिअर गर्ल्स थिरकत असतात. त्याच धर्तीवर पांगरी घाटात बारीचे सेकंद पुकारून झाल्याबरोबर या मराठमोळ्या वेष परिधान केलेल्या चिअर गर्ल्स मराठी गाण्यांवर नाचून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणीत करीत होत्या.

आयोजकांच्या या अनोख्या शक्कलला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. या प्रकाराची चर्चा तालुक्यातील गावोगावी आणि सोशल मीडियावर जिल्हाभर पोहोचल्याने त्यावर चर्चा सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button