Goa Cabinet : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडे गृह, अर्थची जबाबदारी, आरोग्य खाते पुन्‍हा एकदा विश्वजित राणेंकडे | पुढारी

Goa Cabinet : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍याकडे गृह, अर्थची जबाबदारी, आरोग्य खाते पुन्‍हा एकदा विश्वजित राणेंकडे

पणजी : पुढारी वृत्तसेवा :  गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाचे (Goa Cabinet) खातेवाटप रविवारी जाहीर  करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गृह व अर्थ या खात्यांसह दक्षता, राजभाषा व प्रशासकीय खाती सोपविण्यात आली आहेत.  विश्वजित राणे यांच्याकडे पुन्हा एकदा आरोग्य व महिला आणि बालकल्याण खात्‍याची जबाबदारी देण्‍यात आली आहे. याशिवाय त्यांच्‍याकडे नगरनियोजन, नगरविकास व वनखात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

(Goa Cabinet)  २८ मार्च रोजी संपन्न झालेल्या शपथविधी सोहळ्यात ८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. या सर्वांना आज (रविवार) खातेवाटप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री असणाऱ्या रवी नाईक यांना कृषी, नागरी पुरवठा व हस्तकला विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. माविण गुदिन्हो यांच्याकडे वाहतूक, उद्योग, पंचायत, शिष्टाचार व संसदीय व्यवहार खात्यांची धुरा सोपविण्यात आली आहे. पर्यावरण खाते पुन्हा एकदा निलेश काब्राल यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यासोबत त्यांना संसदीय व्यवहार, सार्वजनिक बांधकाम, कायदा व न्याय्य ही खाती देण्यात आली आहेत. सुभाष शिरोडकर यांच्याकडे सहकार, जलस्रोत विकास व प्रोव्हेदोरिया खाते दिले गेले आहे.

पर्वरीचे आमदार रोहन खवंटे यांना माहिती व तंत्रज्ञान खात्यासह पर्यटन तसेच प्रिंटिंग व स्टेशनरी खाते दिले गेले आहे. गोविंद गावडे यांच्याकडे पुन्हा एकदा कला व सांस्कृतिक खाते देण्यात आले आहे. यासोबत क्रीडा व ग्रामविकास खात्याची जबाबदारी त्यांना दिली गेली आहे. पणजीचे आमदार अंतानिआसो मोन्सेरात यांच्याकडे महसूल, कामगार व कचरा व्यवस्थापन खाते दिले गेले आहे.

उरलेली खाती कुणाला?

शपथ घेतलेल्या ८ मंत्र्यांना आज खातेवाटप झाले आहे. अद्याप वीज, शिक्षण आणि समाजकल्याण या महत्त्‍वाच्‍या खात्यांचे वाटप बाकी आहे. त्यामुळे ही खाती कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे खातेवाटपाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button