श्रीलंकेच्या हवाईसेवेत विमान कंपन्यांकडून कपात | पुढारी

श्रीलंकेच्या हवाईसेवेत विमान कंपन्यांकडून कपात

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या श्रीलंकेला जाणाऱ्या पर्यटकांच्या तसेच प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने विमान कंपन्यांनी श्रीलंकेच्या हवाई सेवेत कपात करण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात अलीकडेच खाजगी झालेल्या एअर इंडियाने केली आहे. सध्या आठवड्यातून १६ विमाने श्रीलंकेला जातात. पुढील 8 तारखेपासून ते 31 मे पर्यंत ही संख्या 13 पर्यंत खाली आणली जात असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.

चीनी कर्जाच्या जाळ्यात अडकल्यामुळे श्रीलंकेची पूर्णपणे वाताहात झाली आहे. अत्यावश्यक गोष्टींचा तुटवडा तसेच महागाई गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. यातच हिंसाचार सुरु झाल्याने सरकारने आणीबाणी जाहीर केलेली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम तेथील पर्यटनावर झाला आहे. श्रीलंकेला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या पूर्णपणे रोडावली आहे.

अर्थात यामुळे भारतातून लंकेला जाणाऱ्या विमान तिकीटाची मागणीही कमी झाली आहे. दरम्यान एअर इंडियापाठोपाठ इतर हवाई वाहतूक कंपन्यांनी देखील कोलंबोसाठीच्या हवाई सेवेत कपात करण्यावर विचार सुरू केला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Back to top button