Pakistan SC : इम्रान खान सरकारविराेधात विरोधकांची सुप्रीम कोर्टात धाव, विशेष खंडपीठासमाेर हाेणार सुनावणी

Pakistan SC :  इम्रान खान सरकारविराेधात विरोधकांची सुप्रीम कोर्टात धाव, विशेष खंडपीठासमाेर हाेणार सुनावणी

इस्‍लामाबाद : पुढारी ऑनलाईन
पाकिस्‍तानमधील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. आज इम्रान खान सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍ताव संसदेच्‍या उपसभापतींनी फेटाळून लावला. यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्‍त करण्‍याची विनंती राष्‍ट्रपती आरिफ अल्‍वी यांना केली. त्‍यांनीही त्‍याला तत्‍काळ मान्‍यता देत संसद बरखास्‍त केली. या निर्णयाविरोधात विराधी पक्ष नेत्‍यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात ( Pakistan SC ) धाव घेतली आहे. मुख्‍य न्‍यायाधीशांनीही याची गंभीर दखल घेत या प्रकरणी दाखल याचिकांवरील सुनावणीसाठी मुख्‍य न्‍यायाधीशांनी विशेष खंडपीठाची स्‍थापना केली आहे.

पाकिस्‍तानमधील विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात २५ मार्च रोजीच अविश्‍वास प्रस्‍ताव आणला होता. याचेळी विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारच्‍या भूमिकेवर संशय व्‍यक्‍त केला होता. पाकिस्‍तानमधील जियो टीव्‍हीने दिलेल्‍या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्‍या सरकारला १४४ सदस्‍यांचे तर विरोधी पक्षाला १९९ सदस्‍यांचे समर्थन होते. त्‍यामुळेच इम्रान खान यांनी प्रस्‍तावावर मतदान होण्‍यापूर्वीच तो फेटाळण्‍याचे नियोजन केले, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

राजकीय घडामोडींमध्‍ये हस्‍तक्षेप करणार नाही : पाकिस्‍तान लष्‍कर

पाकिस्‍तानमधील राजकीय घडामोडींमध्‍ये हस्‍तक्षेप करणार नाही, असे पाकिस्‍तानच्‍या लष्‍कराने म्‍हटले आहे. पाकिस्‍तान संसदेमध्‍ये झालेली प्रक्रिया ही राजकीय कामकाजाचा भाग आहे. यामध्‍ये पाकिस्‍तान लष्‍कर हस्‍तक्षेप करणार नाही, लष्‍कराच्‍या प्रवक्‍त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

Pakistan SC : सुप्रीम कोर्टाचे मुख्‍य न्‍यायाधीश घेणार बैठक

पाकिस्‍तान संसद बरखास्‍त करण्‍याच्‍या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष नेत्‍यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात धाव घेतली आहे. या याचिकांवर विचार करण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायाधीश हे या प्रश्‍नी सहकार्‍यांबरोबर आपल्‍या निवासस्‍थानी बैठक घेणार आहेत. यावेळी ते पाकिस्‍तान घटनेतील तरतुदींसंदर्भात चर्चा करतील, असे पाकिस्‍तानच्‍या माध्‍यमांनी म्‍हटलं आहे.

पाकिस्‍तानची संसद बरखास्‍त,९० दिवसांमध्‍ये होणार निवडणुका

पाकिस्‍तान संसदेमध्‍ये अविश्‍वास प्रस्‍ताव फेटाळल्‍यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्‍ट्रपतींना संसद ( Pakistan Assembly ) बरखास्‍त करण्‍याची मागणी केली. त्‍यानुसार राष्‍ट्रपतींन पाकिस्‍तान संसद बरखास्‍त करण्‍याचे आदेश दिले असून, आता पुढील ९० दिवसांमध्‍येव निवडणुका घेण्‍यात रेणार आहेत.

पाकिस्‍तान संसदेचे उपसभापती कासिम खान सूरी यांनी घटनेतील कलम पाच मधील नियमाचा हवाला देत अविश्‍वास प्रस्‍ताव विनामतदानच फेटाळून लावला. यापूर्वी संसदेचे सभापती असद कैसर यांच्‍यावरही अविश्‍वास प्रस्‍ताव मांडल्‍यानंतर सुरी यांनी सभापतीपदाची सूत्रे स्‍वीकारली होती.

विरोधी पक्ष नेत्‍यांचे संसद परिसरात धरणे आंदोलन

पाकिस्‍तानमधील इम्रान खान सरकारविरोधातील अविश्‍वास प्रस्‍ताव विना मतदानच फेटाळण्‍यात आला. त्‍यानिर्णयाविरोधात आता विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संसदेतच त्‍यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news