Latest

Pune Murder Mystery : प्रेयसीचा खून करून मृतदेहाची केली तीन खांडोळी

दीपक दि. भांदिगरे

पिंरगूट (पुणे); पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीचा खून (Pune Murder Mystery) करून मृतदेहाची खांडोळी पिंरगूट आणि मुठा घाटात फेकून देणार्‍या प्रियकराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल बारा दिवसानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा (Pune Murder Mystery) लावत हनुमंत अशोक शिंदे (वय 40, रा. 277, बुधवार पेठ) याला अटक केली. तर रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी (वय 30, रा. बुधवार पेठ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी, हनुमंत शिंदे याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 12 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास नारायण पेठ परिसरात घडली. प्रेयसीकडून सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून शिंदे याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हनुमंत शिंदे हा मोबाईल दुरुस्तीचे काम करतो. त्याचे बुधवार पेठेत दुकान आहे. तर खून झालेली महिला ही बुधवार पेठेत देहविक्री करत होती. त्यातूनच दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते.

सूत जुळल्यानंतर हनुमंत याने रोजिना हिला नारायण पेठेत फ्लॅट भाड्याने घेऊन दिला होता. हनुमंत हा पुर्वीच विवाहीत आहे. त्यामुळे तो अधुनमधून तिच्याकडे जात होता. रोजिना हनुमंतला त्याच्यासोबत राहण्यास सांगत होती. ती त्याला घरी जाऊ देत नव्हती.

तसेच तिला दारुचे व्यसन देखील होते. दररोज ती देहविक्रीसाठी बुधवार पेठेत जात होती. सकाळी सोडण्याचे आणि संध्याकाळी घेऊन जाण्याचे काम हनुमंत याला करावे लागत होते. त्यातूनच दोघांत वाद होत होते.

12 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास हनुमंत रोजिनाच्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी तिने त्याच्यासोबत तू दिवसभर घरी आला नाही म्हणून वाद करत शिवीगाळ केली. त्यावेळी रागाच्या भरात हनुमंत याने रोजिनाचा गळा दाबून खून केला.

त्यानंतर तो फ्लॅट बंद करून अक्कलकोट येथे पळून गेला होता. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा पुण्यात आला. या कालावधीत तब्बल तीन दिवस रोजिना हिचा मृतदेह घरातच पडून होता. हनुमंतच्या डोक्यात मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचा विचार सुरू होता.

त्यासाठी त्याने 14 ऑगस्ट रोजी रात्री मित्राचा छोटा चारचाकी टेम्पो सामान शिफ्ट करण्याच्या बहाण्याने मागून घेतला.

त्यानंतर कोयत्याने रोजिना हिच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ताडपत्रीच्या पिशवीत भरून भुगाव ते लवासा घाट परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. त्यानंतर तो आपण कोणताच गुन्हा केला नसल्याच्या अविर्भावात फिरत होता.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने आरोपी हनुमंत शिंदे याला सोबत घेऊन भुगाव ते लवासा घाट परिसरातील विविध ठिकाणी टाकून दिलेले मृतदेहाचे तुकडे जमा केले. दोन पिशव्या कुजलेल्या अवस्थेत पोलिसांच्या हाती लागल्या असून, पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहेत.

ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी पांडुरंग वाजंळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर, हनुमंत कांदे, अमर पवार यांच्या पथकाने केली.

महिला बेपत्ता असल्याची पोलिसांना लागला सुगावा

बुधवार पेठेत देहविक्री करणारी एक महिला दहा ते बारा दिवसांपासून बेपत्ता असल्याचा सुगावा पोलिस कर्मचारी लांडगे यांना बातमीदारामार्फत लागाल होता. संबंधीत महिलेचे हनुमंत शिंदे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानुसार पोलिस हनुमंत याच्यावर पाळत ठेवून होते. संशय आल्यानंतर पोलिसांनी हनुमंत शिंदे याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता, तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. प्रेयसीकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून त्याने खून केल्याची पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती.

हे ही वाचा :

पहा व्हि़डिओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT