जळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र व इतर राज्यात मारुती कंपनीची स्विफ्ट किंवा स्विफ्ट डिझायर वाहनांची साईड काच फोडून चोरी करुन धुमाकुळ घालणाऱ्या दाऊद गँग जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
मारुती कंपनीची स्विफ्ट किंवा स्विफ्ट डिझायर वाहनांची साईड काच फोडून चोरी करुन राज्यात नव्हे तर इतर राज्यात सुद्धा दाऊद गँगने धुमाकूळ घातला होता. या दाऊद गँगची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे सफौ. अशोक महाजन, सफौ. शरीफोद्दीन काझी, पो. हे. कॉ वसंत लिंगायत, पो. ना. युनुस शेख, पो. ना. किशोर राठोड, पो. ना. रणजीत जाधव, पो. ना. कृष्णा देशमुख, पो. कॉ. विनोद पाटील, पो.कॉ. उमेशगीरी गोसावी, चा. पो. ना मुरलीधर बारी, चा. पो. ना अशोक पाटील या पथकाला बुलढाणा येथे रवाना केले.
पोलिसांचे हे पथक २ दिवसांपासून बुलढाणा येथे ठाम मारुन होते. अखेर दाऊद गँगचे शेख झिशान, शेख दाऊद (वय २७, रा. धाड करडी, ता. जि. बुलढाणा) शेख सद्दाम शेख मनु (२५, रा. घाटनांद्रा ता. जि. बुलढाणा) या २ सदस्यांना पकडण्यात यश आले. त्यांच्याकडून ६ लाख ४५ हजार रुपयांच्या २ मारुती कंपनीच्या स्विफ्ट व स्विफ्ट डिझायर जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी जामनेर पोलिस स्टेशनकडील १ व पहूर पोलिस स्टेशन कडील १ एकुण २ गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या २ स्विफ्ट डिझायर गाड्या त्यांनी हिंगोली व नांदेड येथून चोरल्याचे कबुल केले आहे.
या प्रमाणे वरील गुन्हे दाखल असून, त्यांनी अकोला, वाशिम, जालना, हिंगोली, नांदेड ग्रामीण, औरंगाबाद जिल्ह्यातून अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना जामनेर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे. दाऊद गँग जेरबंद करण्यात पोलिसांना यश आल्याने या टोळीने केलेल्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार आहे.