बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : म्हैसूरमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचारबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची जीभ घसरली. काँग्रेस नेत्यांकडून आपल्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याचे ते म्हणाले. याविरुद्ध राज्यभर व्यापक टीका झाल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा याबाबत जाहीर माफी मागितली.
मुंबईतील विद्यार्थिनी म्हैसूरमधील एका महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत आहे. आपल्या मित्रासोबत ती चामुंडी डोंगरावर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी सहाजणांच्या टोळक्याने त्या दोघांवर हल्ला करून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
अशा गंभीर घटनेविषयी गृहमंत्री ज्ञानेंद्र यांना पत्रकारांनी तपासाविषयी विचारले. त्यावेळी तपास सुरु असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. विरोधी पक्षांकडून याबाबत विनाकारण आरोप केले जात आहेत. त्यांच्याकडून आपल्यावर अत्याचार होत असल्याचे ज्ञानेंद्र म्हणाले.
त्यांच्या संवादाचा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. याविरुद्ध काँग्रेससह अनेकांनी व्यापक टीका केली. पीडितेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी घटनेची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी गृहमंत्र्यांवर अत्याचार झाला असेल तर आपल्या पक्षातील संबंधितांना अटक करावी, पोलिसांनी यामध्ये कोणत्याही दबावाला बळी पडू नये असा टोमणा हाणला. गृहमंत्र्यांनी अशा घटनेच्या बाबतीत विधान करताना भानावर राहण्याची गरज शिवकुमार यांनी व्यक्त केली.