पंधराशे वर्षांपूर्वीच्या प्रेमीयुगुलाचे आलिंगन ! | पुढारी

पंधराशे वर्षांपूर्वीच्या प्रेमीयुगुलाचे आलिंगन !

बीजिंग ः उत्तर चीनमध्ये पंधराशे वर्षांपूर्वी एकमेकांच्या आकंठ प्रेमात असलेले एक प्रेमीयुगुल होते. या दोघांना मृत्यूनंतर एकत्रच दफनही करण्यात आले. एकमेकांना आलिंगन दिलेल्या स्थितीतच दोघांचे दफन झाले होते आणि आता त्यांचे अशा स्थितीतील सांगाडे सापडले आहेत. त्यांचे हे चिरंतन आलिंगन आणि प्रेम 1500 वर्षांनंतरही दिसून येते!

हे जोडपे म्हणजे त्या काळातील एक दाम्पत्य असावे असे संशोधकांना वाटते. या जोडप्यामधील पुरुषाचा आधी मृत्यू झाला असावा आणि त्यानंतर डाव्या हाताच्या बोटात अंगठी परिधान केलेल्या त्याच्या पत्नीने स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिलेले असावे असे संशोधकांचे म्हणणे आहे.

आपल्यालाही पतीसमवेत दफन केले जावे अशी कदाचित तिची इच्छा असावी. अर्थात चीनमध्ये पती-पत्नींचे मृतदेह असे एकत्र दफन केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, अशा आलिंगनबद्ध स्थितीमधील दाम्पत्याचे मृतदेह सापडणे ही एक अनोखी बाब आहे. त्या काळातील लोकांची प्रेमाबाबत बदललेली द‍ृष्टी यामधून दिसू शकते असेही संशोधकांना वाटते. कियान वांग या संशोधकाने सांगितले की प्रेमळ आलिंगन दिलेल्या स्थितीमधील जोडप्याचे अवशेष सापडणे ही चीनमधील पहिलीच घटना आहे.

Back to top button