Latest

PMC : विकासकामांमधील अनियमितता भोवली, पालिकेचे २ अभियंता निलंबित

स्वालिया न. शिकलगार

PMC – महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या विकासकामांमधील गोलमाल प्रकरणी दोन अभियंत्यांचे निलंबन करण्यात आले. आणखी एका अभियंत्याची तातडीने बदली करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.(PMC

शाखा अभियंता अजय परदेशी, कनिष्ठ अभियंता गणेश गिते अशी निलंबीत करण्यात आलेल्या अभियंत्याची नावे आहेत. तर उपअभियंता कन्हैयालाल लाखनी यांची खाते निहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयातील विकासकामांमधील झालेल्या गैरकारभाची वृत्तमालिका दै. पुढारी गत आठवड्यात लावली होती.

यानिमित्ताने पालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कशा पध्दतीने गैरकारभार सुरू आहे याकडेही लक्ष वेधले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आयुक्त विक्रम कुमार यांनी संबधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. दोन अभियंत्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश अतिरिक्र आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी मंगळवारी काढले.

काय आहे प्रकरण?

निविदा क्र. १८३ नुसार सहकारनगर क्र. २ तुळशीबागवाले कॉलनी ग्राऊंडवर जॉगिग ट्रॅक तयार करण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदा महापालिकेच्या सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने काढण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र दशभुजा गणपती रस्त्यावर खराब झालेला फुटपाथ नव्याने तयार करण्याचे काम करण्यात आले.

त्यानंतर पुन्हा निविदा क्र. ५०१ नुसार तुळशीबागवाले कॉलनी ग्राऊंडवर पेव्हर ब्लॉक लावून जॉगिग ट्रॅक तयार करणे, निविदा क्र. ५०२ नुसार सहकारनगर येथील नाना नानी पार्कमध्ये पेव्हर ब्लॉक लाऊन जॉगिग ट्रॅक अशी दोन कामे निश्चित करण्यात आली होती.
या दोन्ही कामांमध्ये जागा बदल आणि कामाच्या स्वरुपात बदल केल्याचे आढळून आले. या प्रकरणी जागा अभियंता लाखनी, गिते आणि परदेशी यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. त्यात अनियमितता आढळून आल्याने या तिघांवरही कारवाई करण्यात आली आहे.

दै. पुढारीच्या पाठपुराव्याला यश

महापालिकेतील विकासकामांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या अनियमितता सुरू झाली आहे. निविदांमधील रिंग, एका कामांचे तुकडे, बजेट विकणे, कामे न करताच बिले काढणे अशा पध्दतीच्या गैरकारभाराकडे 'पुढारी'ने सातत्याने लक्ष वेधून आवाज उठविण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यावर आता प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्याने 'दै.पुढारी'च्या पाठपुराव्याला यश मिळू लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT