Balasaheb Thackeray : शरद पवारांच्या मुलीसाठी बाळासाहेबांनी जाहीर केला होता ‘हा’ निर्णय | पुढारी

Balasaheb Thackeray : शरद पवारांच्या मुलीसाठी बाळासाहेबांनी जाहीर केला होता ‘हा’ निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील राजकीय हाडवैर अखंड देशाने पाहिलं. दोघांनी एकमेकांवर मनसोक्त टीका केली. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यावर तर हे वैर टोकाला गेले. बाळासाहेब हे शरद पवार यांचा उल्लेख ‘मैद्याचे पोते’ असा करत तर पवार बाळासाहेबांचा उल्लेख ‘मावशी’ असा करत; पण याही पलिकडे दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से आजही रंगतात. सुप्रिया सुळे यांची राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना तुमचा उमेदवार कोण असेल? असे विचारले. यावर त्यांनी ‘शरदबाबूंची मुलगी उभी असेल तर आमचा उमेदवार नसेल’ असे सांगून बिनविरोध निवडणूक केली हाेती.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्‍या मैत्रीचे असे अनेक किस्से सांगात येतील. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर त्यांची पहिली सभा शिवाजी पार्कावर झाली. ही सभा मी कट्ट्यावर बसून ऐकली हाेती, अशी आठवण शरद पवार सांगतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना अगदी २०१९ पर्यंत रंगत होता. २०१४ मध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना बाहेरून पाठिंबा देत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले. त्यानंतर ही टीकेची धार अधिक तीव्र झाली. त्यानंतर २०१९ पर्यंत जोरात टीकाटिपण्णी सुरू होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र, चित्र पालटू लागले आणि हे दोन्ही पक्ष काँग्रेससोबत सत्तेत आले. त्यांनी सरकार तयार केले आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली. ही निवड ही सुप्रिया सुळे यांना केलेल्या मदतीची परतफेड नाही, अशी मिश्किली टिपण्‍णी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली होती.

‘ते’ मासिक बाजारात दिसलेच नाही…

राजकारणापलिकडे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती. ही मैत्री दाेघांनी नेहमी जपली. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एक मासिक काढायचे ठरवले. त्यावेळी टाइम या मासिकाची मोठी चर्चा होत असे. बाळासाहेब व्यंगचित्रकार आणि मार्मिक लेखनासाठी ओळखले जात होते. टाइमच्या धर्तीवर राजकीय विषयांना वाहिलेले राजनीती हे मासिक त्यांनी सुरू करायचे ठरविले. अतिशय कष्ट घेऊन त्यांनी या मासिकाचा पहिला अंक काढला. त्यानंतर तो अंक अगदी भक्तिभावाने सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण केला. त्यानंतर हे दोघेही ठाकरे यांच्या बहिणीकडे गेले. त्यांची बहीणाच्‍य ‘अंगात’  येत हाेते. त्यांना या मासिकाचे भविष्य काय असेल असे दाेघांनी विचारले. ‘हा अंक बाजारात दिसणार नाही’ म्हणजेच तो भरमसाठ खपेल असे भविष्य त्‍यांनी सांगितले. शरद पवार हा किस्सा अगदी खुमासदार पद्धतीने सांगतात. ‘ठाकरे यांच्या बहिणीचे भविष्य खरे ठरले. खरंच तो अंक बाजारात दिसला नाही. कारण पुढचा अंकच निघाला नाही,’ असे मिश्किलपणे शरद पवार सांगतात.

Balasaheb Thackeray  : मैत्र जपले पण सत्तेत सहभाग नाही

सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय एका झटक्यात बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. पवारांची मुलगी निवडणूक रिंगणात  असेल तर मी उमेदवार देणार नाही, हा निर्णय त्‍यांनी झटक्यात घेऊन टाकला. त्यांनी शरद पवार यांच्‍या कन्‍या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येतील, असे भाकित अनेकजण वर्तवित होते. मात्र, तसे झाले नाही. १९९९ मध्ये युतीचे सरकार येईल असे वाटत असताना सेना आणि राष्ट्रवादी आघाडी होईल, असे भाकितही वर्तविले जात होते. मात्र, बाळासाहेबांनी शरद पवारांवर कडवी टीका केली.  त्यांना स्काउंड्रल असे संबोधले होते. ‘मी दुष्टपणा करणाऱ्यांना कसा काय रोखू?’ असे ठाकरे पवारांना म्हणाले होते. पवारांनी काँग्रेसमधून फुटून राष्ट्रवादी स्थापन केली होती. ‘स्काऊंड्रल’ या विधानाला वाजपेयींचे सरकार पाडण्याचा संदर्भ होता.

Balasaheb Thackeray  : शरदबाबू, मैद्याचे पोते आणि मावशी

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही मित्र असले तरी त्यांनी एकमेकांना जाहीर सभामधून कधीच सोडले नाही. शरद पवार यांना ‘हे बारामतीचं मैद्याचं पोतं’ असे संबोधत त्यांच्यावर बाळासाहेब अनेक आरोप करत. ठाकरेंच्या टीकेची धार वाढत गेल्यानंतर ठाकरेंना ‘मावशी’ असे संबोधत त्यांची यथेच्छ खिल्ली पवार उडवत असत. मात्र, त्या दोघांची गाढ मैत्री असल्याने राजकीय टीकेपलिकडे त्यांचे संबंध कायम राहिले.  बाळासाहेब बऱ्याचदा त्यांना शरदबाबू म्हणत असता. त्यांनी एकमेकांवर टीका केली असली तरी त्यात विखार नव्हता.

Balasaheb Thackeray  यांनी एका क्षणात निर्णय घेतला…

२००६ च्या सप्टेंबरमध्ये राज्यसभेसाठी निवडणूक लागली. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला. ही जागा युती लढवेल असे म्हटले जात होते. मात्र, त्यावेळी एका ज्येष्ठ पत्रकाराने माहिती घेण्यासाठी थेट बाळासाहेबांना फोन लावला. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात युतीचा उमेदवार कोण देणार असे त्यांनी फोनवर विचारले. त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘शरदबाबूंच्या सुप्रियाला मी लहान असल्यापासून ओळखतोय. आज तिला संधी आल्यावर मी तिच्याविरोधात कसा उमेदवार देईल?’ असे म्हणत प्रश्नच निकाली काढला. राजकीय कक्षांपलिकडे बाळासाहेबांनी हा निर्णय घेतला होता. तेव्‍हापासून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्‍यातील राजकारणा पलिकडील मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button