नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
संसदेत उपस्थित राहण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी मंगळवारी भाजप खासदारांची कानउघाडणी केली. खासदारांनी संसदेत उपस्थित राहिले पाहिजे तसेच त्यांनी लोकहिताची कामे केली पाहिजेत, असे मोदी यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बोलताना सांगितले.
संसदेत हजर राहण्याबाबत दरवेळी सांगणे योग्य वाटत नाही. लहान मुलांनाही एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर त्यांना वाईट वाटते. तुमच्यात परिवर्तन घडवून आणा, अन्यथा परिवर्तन आपोआप येउ शकते, असा अप्रत्यक्ष इशाराही पंतप्रधान मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी खासदारांना दिला.
संसदेत कामकाजावेळी हजर राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी वारंवार भाजप खासदारांना केलेले आहे. तथापि कामकाजातील पक्षाच्या खासदारांची उपस्थिती नगण्य होत चालली आहे. खासदारांनी सूर्यनमस्कार करावे. सूर्यनमस्काराची स्पर्धा करावी. यामुळे आरोग्य चांगले राहील, असा सल्ला मोदी यांनी दिला. 13 तारखेला मी काशीला जात आहे. पण पहिल्यांदाच तुम्हाला येउ नका, असे सांगत आहे. कारण त्यावेळी संसदेचे कामकाज चालू असणार आहे, असे ते म्हणाले.
पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मान दिला जावा, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, खासदारांनी आपल्या भागातील क्रीडा अभियान एका महिन्यात संपवू नये, तर प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या स्वरूपाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलं का?