Winter Diet Changes Pudhari
पिंपरी चिंचवड

Winter Diet Changes: पिंपरी-चिंचवडमध्ये थंडीचा गारवा वाढला! शरीराला नैसर्गिक ऊब देण्यासाठी आहारात मोठे बदल, बाजरी, तीळ आणि सुकामेव्याला वाढती मागणी.

पचन सुधारते, भूक वाढते! गरमागरम सूप, मसाला चहा आणि अस्सल हुरडा पार्ट्यांचा हंगाम सुरू; नागरिकांकडून पौष्टिक फक्कड बेताला पसंती.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : शहर परिसरात वाढत्या थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि शरीराला नैसर्गिकरित्या ऊबदार ठेवण्यासाठी आहारात मोठे बदल करत आहेत.

या काळात, विशेषतः उष्मांक आणि पोषणमूल्ये जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. यामध्ये बाजरी, तीळ अशा पदार्थांचा आहारात समावेश करत आहेत; तसेच सुकामेवा खाण्याकडेही कल वाढला आहे. त्यामुळे एरवीपेक्षा चविष्ट आहार खाण्याची मजा वाढणार आहे.

थंडीच्या दिवसात पचनक्रिया सुधारते आणि भूक जास्त लागते. या वाढलेल्या भुकेला शमवण्यासाठी आणि शरीराची ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यासाठी, अनेकजण आपल्या आहारात पौष्टिक आणि उष्णता निर्माण करणाऱ्या अन्नपदार्थांचा समावेश केला जात आहे. आहारात प्रामुख्याने बाजरी किंवा ज्वारीची भाकरी, आणि विविध प्रकारच्या भाज्यांपासून बनवलेले घट्ट पदार्थ जे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देतात; तसेच विविध प्रकारचे गरमागरम सूप पिण्यासही पसंती दिली जात आहे.

सुकामेवा हे पदार्थ शरीराला त्वरित ऊर्जा आणि उष्णता देतात. यामध्ये बदाम, अक्रोड, काजू आणि शेंगदाणे यांसारखे स्निग्ध पदार्थ आहारात समावेश केला जात आहे.

वाढत्या थंडीपासून संरक्षणासाठी अनेकांचे आवडते पेय म्हणजे चहा, चहा विक्रेतेदेखील थंडीमुळे ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे चहा, कॉफी आदी पर्याय ठेवत आहेत. यामध्ये मसाला चहा, जायफळ, वेलची, आले, गवती चहा असे प्रकार पहायला मिळतात.

तसेच या दिवसात बाजरीची भाकरी, ठेचा, वांग्याचे भरीत असा फक्कड बेत घरात आखला जातो. या ऋतूत हुरड्याचा हंगाम जोरात असतो. हुरडा पार्ट्यांना येत्या काही दिवसांत सुरुवात होईल. फेबुवारीपर्यंत हा हंगाम उत्तरोत्तर रंगत जाईल. थंडीत शहरातील नागरिकांसाठी ही एक मेजवानी असते. सोशल मीडियावर हुरडा पार्ट्यांच्या पोस्टबरोबरच चटणी-खोबऱ्यासह हुरड्याची ‌‘रेडी टू इट‌’ पाकिटे घरपोच पाठविण्याची यादी दिसते आहे.

दुकानांमध्ये पौष्टीक आणि गुणधर्माने उष्ण असलेल्या बाजरी, तीळालादेखील मागणी वाढली आहे. तसेच ड्रायफुट आणि आहारात तुपाचा समावेश वाढला आहे. मिठाईच्या दुकानांमध्येदेखील ड्रायफुट लाडूला मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT