

पिंपरी : गणेशोत्सव मिरवणुकांदरम्यान लेझर बिमचा वापर करण्यास स्पष्ट मनाई असूनही सांगवी परिसरातील एका गणेश मंडळाने नियमांचे उल्लंघन केले. याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात मंडळाच्या अध्यक्षाला पिंपरी न्यायालयाने दोन दिवसांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा द्रव्य दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
गोपी पंढरीनाथ लोखंडे (34) असे शिक्षा झालेल्याचे नाव असून ते वैदवस्ती पिंपळे गुरव येथील भैरवनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत.
गणेशोत्सव काळात जनतेच्या सुरक्षिततेसाठी डोळ्यांना इजा होऊ शकणाऱ्या प्रखर लेझर व बिम लाईटच्या वापरास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सक्त मनाई केली होती. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी जारी केलेल्या या आदेशानुसार, सर्व गणेशोत्सव मंडळांची बैठक घेऊन त्यांना नियमांचे लेखी व तोंडी पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तरीही काही मंडळांकडून लेझर बिमचा वापर केल्याचे समोर आले होते.
भैरवनाथ मित्र मंडळाने 4 सप्टेंबर रोजी रात्री निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक रस्त्यावर प्रखर लेझर व बिम लाईटचा वापर केला असल्याचे सांगवी पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या वेळी मंडळ अध्यक्ष गोपी लोखंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे, तसेच नियमभंगाचा स्पष्ट व्हिडिओ पुरावा तपासून न्यायालयाने मंडळ अध्यक्षाचा दोष सिद्ध केला. यानंतर पिंपरी न्यायालयाने गोपी लोखंडे यांना एक हजार रुपये दंड आणि दोन दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.