

मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीवरून गोंधळ सुरू आहे. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आले आहेत. काही माजी नगरसेवक तसेच, उमेदवारांची नावे गायब झाली आहे. त्यावर राजकीय नेते, माजी नगरसेवक, इच्छुकांनी मोठ्या संख्येने हरकती व तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र, निवडणुकीतील महत्त्वाचा घटक असलेला मतदारराजा त्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. हरकती व तक्रारीकडे सर्वसामान्य मतदारांनी साफ दुर्लक्ष केले आहे. शहराचे भवितव्य ठरविणाऱ्या निवडणुकीबाबत मतदारांना काही देणे- घेणे नसल्याचे त्यावरून दिसत आहे.
महापालिका निवडणूक जानेवारी 2026 ला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 1 ते 32 प्रभागातील एकूण 128 जागांवर माजी
नगरसेवकांसह इच्छुक प्रचारात व्यस्त आहेत. निवडणुकीसाठी महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली आहे.
इच्छुकांनी मतदार यादी विकत घेत प्रभागातून गायब झालेली मतदार नावे शोधून काढली आहेत. त्यावर महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. ते प्रमाण शनिवार (दि.29) पर्यंत तब्बल सव्वापाच हजारांच्या पुढे गेले आहे. पुढील तीन दिवसात बुधवार (दि.3) पर्यंत ती संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मतदारांना मतदान करता यावे म्हणून आपल्या फायद्यासाठी माजी नगरसेवक व इच्छुक धडपड करीत आहेत. गायब झालेली मते आपल्याला मिळावी यासाठी ते मेहनत घेत आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाशी भांडत आहेत. निवडणुकीत एक- एक मत हे महत्वाचे असते. इच्छुक मतांसाठी सर्व प्रकाराचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
असे असले तरी, निवडणुकीतील महत्वाचा घटक असलेला शहरातील मतदार राजा या प्रक्रियेपासून अलिप्त आहे. सर्वसामान्य मतदार आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही, याबाबत सजग असल्याचे दिसत नाही. शहरातील केवळ 333 मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नाही, यासाठी अ अर्ज भरला आहे. प्रत्येक प्रभागात अंदाजे किमान 2 हजार मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात जोडण्यात आली आहेत. त्यानुसार तब्बल 64 हजारांपेक्षा अधिक मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रत्यक्षात ती संख्या अधिक आहे. त्यानुसार प्रत्येक मतदारांने मतदार यादी तपासून हरकती नोंदविणे अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. त्यामुळे शहराचे भवितव्य ठरविणार्या निवडणुकीबाबत मतदारांना काही घेणे देणे नसल्याचे दिसत आहे.
मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. अनेकांची नावे यादीतून गायब झाली आहेत. मतदानांच्या दिवशी मतदान केंद्रावर आल्यानंतर आपले नाव मतदार यादीत नसल्याने आढळून आल्यास अनेक जण संताप व्यक्त करतील. नाव तसेच, केंद्र शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे. त्यावरून संताप व्यक्त करण्याची संख्या वाढणार आहे. निवडणूक विभाग आणि महापालिका प्रशासनाला दोष दिला जाईल. मी मतदार राजा असल्याचे सांगण्याचा फुसका प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, त्या दिवशी प्रशासनाला काहीच करता येणार नाही. परिणामी, मतदान न करता किंवा संबंध नसलेल्या प्रभागात मतदान करण्याची नामुष्की त्या मतदारांवर येते. ते टाळण्यासाठी नागरिकांनी बुधवार (दि.3) पर्यंत असलेल्या मुदतीमध्ये आपल्या नावाची खातरजमा करून घेण्याची गरज आहे.
महापालिकेने 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, हे तपासून घ्यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने वारंवार केले आहे. गांधीनगर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, महापालिकेचा तळमजल्यावरील निवडणूक विभाग तसेच, सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयातील मतदार मदत कक्षात छापील मतदार यादीत नाव शोधून दिले जाते. तसेच, महापालिकेच्या ुुु.लािलळपवळर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर घर बसल्या मोबाईलवर नाव शोधता येते. दुसर्याच प्रभागात नाव गेले असल्यास आधारकार्डची झेराक्स प्रत जोडून फॉर्म अ भरून दिल्यास महापालिकेकडून कार्यवाही केली जात आहे. त्यासाठी घरापासून जवळ असलेल्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊ अर्ज भरण्याची गरज आहे.
आपण राहत असलेल्या प्रभागातील मतदार यादीत नाव नसल्यास संबंधित मतदारांने अर्ज अ भरून द्यावा. त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. हरकत, तक्रार, सूचना तसेच, फॉर्म भरून देण्याची बुधवार (दि.3) पर्यंत मुदत आहे. त्यानंतर महापालिका कोणताही तक्रार स्वीकारणार नाही, असे महापालिकेने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यंनी सांगितले.