Leopard Social Media Video: बिबट्या आला रे..! सोशल मीडियावरील फेक बिबट्या व्हिडिओंमुळे वन विभागाला फुटला घाम.

AI द्वारे तयार केलेले फोटो, व्हिडीओ व्हायरल करून लाईक्स मिळवण्याचा ट्रेंड! नागरिकांची धावपळ थांबवा, बिबट्या दिसल्यास काय कराल? रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांचे हाल.
AI Leopard Viral Videos
AI Leopard Viral VideosPudhari
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : राज्यात आणि पुणे शहराच्या आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये बिबट्याने माणसांना आणि जनावरांना भक्ष्य केल्याच्या बातम्या माध्यमांव्दारे लोकांपर्यंत जात आहेत. त्यातच ‌‘एआय‌’द्वारे तयार केलेले फेक व्हिडिओही समाज माध्यमांवर फिरत असल्याने अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आपल्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या व्हायरल होणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र बिबट्याचे दर्शन झाल्याचे अनेक कॉल एकाचवेळी वन विभागास प्राप्त होत असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी धावणाऱ्या वन विभागाला पुरता घाम फुटला आहे. या सर्व प्रकारात सोशल मीडियावरील बनावट व्हिडीओमुळे ‌‘लांडगा आला रे‌’ या कथेसारखी दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरातील एखाद्या भागामध्ये बिबट्याचे दर्शन झाले की, त्याच्या जवळपासच्या तीन ते चार ठिकाणी बिबट्या फिरत असल्याच्ये ‌‘एआय‌’व्दारे तयार केलेले फेक व्हिडीओ समाज माध्यमावर फिरतात. त्यामुळे वन विभागाला विनाकारण पाचारण केले जाते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अशा गोष्टी वन विभागाला कराव्या लागतात.

मात्र, प्रत्यक्षात हे फेक व्हिडीओ असल्याने एवढ्या सगळ्या गोष्टींचा केलेला खटाटोप व्यर्थ जातो. बिबट्या शहरात एखाद्या ठिकाणी आला की, सर्वत्र आता सोशल मीडियातून बातमी पसरते. नागरिकांनाही बिबट्या मनुष्यवस्तीत यायला लागला याची भीती वाटते आणि नवलही. जंगलतोड होत आहे म्हणून की, बिबट्याला जंगलात अन्न मिळत नाही, म्हणून तो शहरात आला का, असे अनेक प्रश्न उभे राहतात.

देहूरोड, मुळशी, मावळ, कासारसाई या परिसरात बिबट्याचा वावर आहे. तर पाचाणे व पुसाणे याठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे. दुर्गादेवी टेकडीवरदेखील बिबट्या पकडल्याच्या घटना घडल्या आहेत.

बिबट्या समूहाने राहत नाही

एक बिबट्या एका वेळी 25 किलोमीटर फिरतो. एखादा बिबट्या तेवढ्या परिसरात असल्यास दुसरा बिबट्या तिथे येत नाही, त्याचा तो स्वभाव आहे. कारण बिबट्याला समूहाने रहायला आवडत नाही. फक्त विणीच्या काळामध्ये बऱ्याचदा नर व मादी एकत्र दिसतात. आत्तापर्यंत शहरात बिबट्याने फक्त जनावरांवरच हल्ले केले आहेत. बिबट्याचा खरेच परिसरात वावर आहे का, हे सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्या पावलांच्या ठशावरूनच कळते. ग्रामीण भागातील नागरिकांकडे वन विभागाचा हेल्पलाईन नंबर आहे; तसेच वन विभागाने ग्रामीण भागातील नागरिकांना सर्व जीपीआरएस मॅप दिला आहे. त्या माध्यमातून ते फोटो व व्हिडीओ काढतात आणि पाठवितात. त्यामुळे वनविभागाला कोणत्या परिसरात बिबट्या आहे हे कळते.

वन विभागाचे लक्ष विचलित

सोशल मीडियावर पोस्ट देण्यासाठी आणि लाईक मिळविण्यासाठी नेटकरी बिबट्याचे फोटो टाकून त्या ठिकाणची माहिती टाकून ते अपलोड करतात. त्यामुळे वन विभागाचीदेखील दिशाभूल होते. ज्या ठिकाणी बिबट्या दिसला ते ठिकाण सोडून दुसरीकडेच रेस्क्यू टीम जावून पोहचते. एकाच ठिकाणी विविध ठिकाणी बिबट्या दिसला असा आभास केला जातो. काही फोटो पाहिले तर ते ‌‘एआय‌’च्या माध्यमातून तयार केले आहेत. मागे चऱ्होलीतील एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या दिसला आहे. तेच फोटो ‌‘एआय‌’व्दारे एडीट करून मांजरी, खराडी, वडगाव, फुरसुंगी याठिकाणी बिबट्या दिसल्याचे सोशल मीडियावरून व्हायरल केले गेले. ही माहिती मिळताच वन विभाग कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा तेथे कामाला लागते; मात्र प्रत्यक्षात त्या परिसरात बिबट्या आढळून येत नाही; परंतु एखाद्या परिसरात खरेचच बिबट्याचा वावर असेल व याबाबतची माहितीची वन विभागाने शहानिशा न केल्यास दुर्घटना होऊ शकते; तसेच संबंधित ठिकाणी वन विभागाचे पथक न पोहोचल्यास अधिकार्यांना दोष लावला जातो. अशा काही अतिउत्साही व्यक्तींच्या वागण्याचा त्रास वन विभाग तसेच नागरिकांनाही होत आहे. तसेच सोशल मीडियावरील फेक व्हिडिओमुळे वन विभागाची पुरती दमछाक होत आहे. वन विभागाने नागरिकांकडे सीसीटीव्ही फुटेज मागितल्यास ते दिले जात नाही.

बिबट्या दिसल्यास काय कराल ?

बिबट्या दृष्टीस पडल्यास सरळ उभे रहा. कमरेत वाकू नका किंवा खाली बसू नका. नाही तर तो तुम्हाला जनावर समजून हल्ला करेल. सरळ उभे राहून मागे मागे चालत यायचे.

शेतात जाताना मोठ्याने गाणी गा किंवा मोबाईलमध्ये गाणी लावा.

बिबट्या हा प्राणी घाबरट आहे. तो सहसा हल्ला करत नाही. परंतु, व्यक्ती एकटा असेल तर कदाचित तो हल्ला करतो. माणसाची गर्दी असेल तर तो हल्ला करत नाही.

एका व्हिडीओमध्ये बिबट्या स्कुटीवर बसला आहे असा फोटो होता. त्या वेळी फोटो टाकणाऱ्या व्यक्तीला विचारणा केली असता. बिबट्याचा झाडावर चढतानाचा फोटो घेऊन ‌‘एआय‌’च्या माध्यमातून स्कुटीवर बसलेल्या बिबट्याचा फोटो व्हायरल केला असल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये व्यक्तीची प्रसिद्धी होते; मात्र त्यामुळे वनविभागाची दिशाभूल केली जाते. बिबट्या पडकण्यासाठी रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांचे हाल होतात.

विक्रम भोसले, रेस्क्यू टीम वनविभाग

एआयच्या माध्यमातून तयार केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरवले जात आहेत. या व्हिडीओमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांची नाट्यमय चित्रे आणि भीतीदायक दृश्ये दाखवली जात आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये आणखी दहशत निर्माण होत आहे; परंतु हे व्हिडीओ खोटी माहिती पसवतात. अनेकदा अशा व्हिडीओमध्ये बिबट्याच्या हल्ल्याचे प्रसंग नाट्यमय पद्धतीने दाखवले जातात, ज्यामुळे लोकांमध्ये आणखी अधिक भय निर्माण होते.

शुभम पांडे, संस्थापक, अध्यक्ष वर्ल्ड फोर नेचर )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news