

मिलिंद कांबळे
फेबुवारी 2017 च्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नगरसेवक फोडून आपल्या पक्षात घेतले. महापालिकेतील भष्टाचाराचा मुद्दा पुढे करून तसेच, मोदी लाट आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत असलेली नकारात्मकता या जोरावर भाजपने प्रथमच महापालिकेत सत्ता मिळविली. त्यानंतर बरेच पाणी वाहून गेले.
महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता गेल्यानंतर शिवसेना व भाजप महायुतीची सत्ता आली. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने पक्षाची ताकद विभागली गेली. अजित पवार महायुतीत भाजपसोबत सामील झाले. महापालिकेत एकसंघ राष्ट्रवादीचे 36 नगरसेवक होते. अजित पवारांसोबत शहरातील सर्वांधिक पदाधिकारी व माजी नगरसेवक आहेत. मात्र, महापालिकेत कट्टर विरोधातील भाजपसोबतची मैत्री केवळ तोंडदेखली असली असल्याचे अनेक उदाहरणावरून समोर आले आहे. पक्षाच्या मेळाव्यात भाजपच्या आमदारांवर जाहीर टीका करण्यात आली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची शहरात अधिक बळ असल्याचे दिसते. पिंपरी विधानसभेत अण्णा बनसोडे हे पक्षाचे आमदार आहेत. ते विधानसभा उपाध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेलेले माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे माजी नगरसेवकांसोबत पुन्हा स्वगृही परतले आहेत. हातातून निसटलेली सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी पक्षाने संघटन बळकट केले आहे. पक्षाचे नव्याने शहर कार्यकारिणी तयार करून सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी जनसंवाद घेत, महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी, महावितरण, म्हाडा, पोलिस तसेच, इतर सरकारी विभागांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागास सक्त सूचना केल्या. तसेच, पवार यांनी शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या थेट घरी जात संपूर्ण शहर पिंजून काढले. छोटे छोटे मेळावे घेत त्यांना ताकद दिली. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पवार हे पिंपरी-चिंचवड महापालिकासंदर्भातील कामांना प्राधान्य देत असून, आयुक्तांना त्या संदर्भात नियमितपणे सूचना देत आहेत. त्यावरुन पवारांचे पिंपरी-चिंचवडवर विशेष लक्ष असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सत्तेत असूनही, राष्ट्रवादीने डीपीविरोधात महापालिकेवर मोर्चा काढत भाजपच्या कामकाजावर शंका उपस्थित केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी करण्याचा चर्चा केवळ हवाच असल्याचे सद्यस्थितीवरून वाटत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे काही माजी नगरसेवक इतर पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. त्या माजी नगरसेवकांना रोखण्यात अजित पवारांना किती यश येते, हे पाहावे लागणार आहे. त्यावरुन राष्ट्रवादीची खरी ताकद निवडणुकीत दिसून येईल.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग््रेास सर्व 128 जागांवर स्वबळावर लढणार आहे. फेबुवारी 2017 ला हातातून निसटलेली सत्ता आता, आम्ही काबीज करणार आहोत, त्यादृष्टीने आम्ही पूर्ण ताकीदने तयारी करीत आहोत. इच्छुकांकडून अर्ज मागविले असून, आत्तापर्यंत 150 पेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांकडून अर्ज सादर करण्यास तसेच, निवडणूक तयारीस गती येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग््रेासचे (अजित पवार) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.