संतोष शिंदे
पिंपरी : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या वाहनचालकांकडून नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक वास्तव वाहतूक विभागाच्या संयुक्त तपासणीत उघड झाले आहे. वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वायुवेग पथक यांनी संयुक्त मोहिमेत केलेल्या तपासणीत 327 वाहनांची तपासणी करण्यात आली. यापैकी तब्बल 205 वाहने म्हणजेच 62.7 टक्के बस, इको, व्हॅन आणि रिक्षाचालक धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे अधोरेखित होत आहे.
वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या तपासणीदरम्यान अतिप्रवाशी, निष्काळजीपणे वाहन चालवणे, वेगमर्यादेचे उल्लंघन, बस व्हॅनमध्ये अतिरिक्त सीट लावणे, गॅस किटचा चुकीचा
वापर, दरवाजे न लावता वाहन चालवणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. काही चालकांकडे वैध परवाना नव्हता, तर काहींची फिटनेस आणि इन्शुरन्सची मुदतही संपलेली होती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनिवार्य मानले जाणारे फर्स्ट-एड बॉक्स, फायर एक्स्टिंग्विशर, सहाय्यक यांची व्यवस्था अनेक वाहनांत दिसून आली नाही.
पालकांमध्ये नाराजी वाहतूक नियमांनुसार शालेय बसमध्ये बसच्या आकारानुसार निश्चित क्षमतेपेक्षा एकही प्रवासी अधिक ठेवता येत नाही. तसेच, सर्व वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र, पीयूसी आणि विमा अद्ययावत असणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील मोठ्या प्रमाणात वाहनचालक हे नियम पायदळी तुडवत असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्याने पालकांमध्ये तीव नाराजी आहे.
शालेय बस किंवा व्हॅनमध्ये जास्तीचे विद्यार्थी कोंबणे ही एक गंभीर समस्या आहे. अपघाताच्या वेळी अतिप्रवाशी वाहने नियंत्रणाबाहेर जातात आणि दुर्घटनांची तीवता वाढते. काही वाहनांमध्ये सीटच्याऐवजी प्लास्टिक स्टूलचा वापर होत असल्याचे दिसून येते. अपघातप्रसंगी हे स्टूल सरकतात. ज्यामुळे मुलांच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत होऊ शकते. अनेक चालक शाळेजवळील गर्दीच्या रस्त्यांवर वाहने अयोग्य पद्धतीने वळवतात, रस्त्याच्याकडेला अचानक थांबतात किंवा उलटे दिशेने वाहन चालवतात. या निष्काळजीपणामुळे पादचारी विद्यार्थी आणि लहान मुले धोक्यात येतात. काही चालक मोबाइलवर बोलत वाहन चालवत असल्याचेही दिसून येते.
मुलांची सुरक्षितता ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही. पालकांनी आणि शाळांनीही वाहनांची कागदपत्रे, चालकाचा परवाना, फिटनेस, सीटिंग क्षमता यांची नियमित पाहणी करणे गरजेचे आहे. मुलांची सुरक्षितता सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे जाणकारांचे मत आहे.
शालेय वाहतुकीसाठी स्कूल बस पॉलिसीअनुसार बसला पिवळा रंग, स्टॉप बोर्ड, जीपीएस, सीसीटीव्ही आवश्यक
वाहनात महिला कर्मचारी किंवा परिचारिका असणे अनिवार्य
प्रत्येक विद्यार्थ्याकडे सीट असणे बंधनकारक; उभे प्रवासी ठेवणे नियमबाह्य
गॅस किट असलेल्या वाहनांचा शालेय वाहतुकीत वापर टाळणे अपेक्षित
दरवाजे बंद ठेवूनच वाहन चालवणे बंधनकारक
आम्ही दररोज मुलांना सुरक्षित हातामध्ये सोपवतो. विश्वास ठेवून शाळेने सुचवलेली वाहतूक निवडतो. मात्र, चालकच बेफिकीरपणे वाहन चालवत असतील तर मुलांच्या सुरक्षिततेचे काय? यावर प्रशासनाने आणखी कडक कारवाई करणे गरजेचे आहे.पालक, थेरगाव
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणावर नियमभंग आढळून येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. आगामी काळात अशी वाहने जप्तही करण्यात येतील.डॉ. विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड