

गणेश खळदकर
पुणे : दहावी-बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य मंडळाने कंबर कसली आहे. त्यानुसार यंदा दोन मोठे बदल करण्यात आलेत. यामध्ये परीक्षेसंदर्भातील तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर बदली करण्यात येणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकांची वाहतूक डिजिटल लॉक असलेल्या पेटीतून करण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपीमुक्तीसाठी राज्य मंडळ खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य मंडळाच्या माध्यमातून दहावी-बारावीची परीक्षा येत्या फेबुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे. साधारण दोन्ही मिळून 35 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दरवर्षी परीक्षेतील गैरप्रकारासंदर्भात राज्य मंडळाकडून कडक पावले उचलून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येते. परंतु तरीदेखील परीक्षेतील गैरप्रकारांना पायबंद घालण्यात राज्य मंडळाला काही प्रमाणात अपयशच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा मात्र राज्य मंडळाने थेट मुळावर घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावंर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतात. हे गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा पहिल्यांदाच परीक्षेसंदर्भातील सर्व कर्मचाऱ्यांची जवळच्या परीक्षा केंद्रावर बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच ज्याठिकाणी कस्टडी असते. त्या ठिकाणापासून परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिकांची वाहतूक रनरमार्फत केली जाते. त्याला कोणतीही सुरक्षा नव्हती. त्यामुळे यादरम्यानच प्रश्नपत्रिका फुटणे तसेच लीक होण्याचे प्रकार घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रश्नपत्रिकांची वाहतूक डिजिटल पेटीतून करण्यात येणार आहे. त्यानुसार एक पत्र्याची पेटी तयार करण्यात येणार असून, त्याला डिजिटल लॉक लावण्यात येणार आहे. यामध्ये ’जीपीएस’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेनंतर किंवा वेळेअगोदर संबंधित पेटी उघडण्यात आली तर त्याची नोंद ठेवली जाणार आहे.
त्यामुळे प्रश्नपत्रिकांची वाहतूक होत असताना होणाऱ्या गैरप्रकाराला कायमचा आळा बसणार आहे. यंदा बारामतीमधील 25 केंद्रांवर हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. त्यानंतर पुढील काळात संबंधित उपक्रमाची राज्यभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच डिजिटल पेटीची ट्रायल घेण्यात येणार असून, प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणे, ठराविक ठिकाणी, ठराविक वेळेत उघडणे यांसह अन्य गोष्टींची चाचपणी करण्यात येणार असून, बारामतीमध्ये फेबुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेत याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी परीक्षेसंदर्भातील कर्मचाऱ्यांची बदली आणि डिजिटल लॉकची पेटी यासह अन्य उपाययोजना राबविण्यात येणार आहे. या उपाययोजनांबरोबरच शिक्षकांसह अन्य यंत्रणांनी परीक्षा पारदर्शक पार पाडण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
त्रिगुण कुलकर्णी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ.
परीक्षा केंद्रांवर डिजिटल पेटीच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकांची वाहतूक करण्याचा उपक्रम राबवण्याच्या उपक्रमाची पायाभरणी राज्य मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष शरद गोसावी यांनी केली होती. त्यांच्या काळातच अशाप्रकारचा उपक्रम राबवावा, जेणेकरून परीक्षेतील गैरप्रकारांना आळा बसेल अशी योजना करण्यात आली होती. त्यासंदर्भातील प्रस्तावही तयार केला. परंतु ऐन परीक्षेच्या तोंडावर त्यांच्याकडून राज्य मंडळाचा पदभार काढण्यात आला आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा मूळ पदभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु नवीन आलेल्या अध्यक्षांनी संबंधित प्रकल्प पुढे नेला. त्यामुळेच परीक्षेतील गेमचेंजर ठरणारा डिजिटल पेटीच्या उपक्रमाचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.