

आळंदी: पिंपरी-चिंचवड भागातील दूषित रसायनयुक्त सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेल्या इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली असून, आळंदीतील इंद्रायणी नदीघाट, नवीन व जुन्या पुलाखाली शेकडो मृत माशांचा खच पडला आहे. जलचरांना जगणे देखील मुश्कील झाले असल्याचे चित्र आहे.
इंद्रायणी नदीपात्रात मृत अवस्थेतील मासे मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. इंद्रायणी नदीचे पाणी खराब झाल्याने सिद्धबेट बंधाऱ्यातून ढापे काढत पाणी सोडण्यात आले. यावेळी सांडव्यावर अक्षरशः फेसयुक दूषित पाणी पांढरा शुभ रंगाने वाहताना दिसून येते. असा सर्व प्रकार घडत असताना नदीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारे संबंधित प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कसलीच कारवाई करताना दिसून येत नसल्याचा आरोप आळंदीकर करत आहेत. नदीप्रदूषणाला नक्की कारणीभूत कोण आणि त्यावर कारवाई कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नदीचे पात्र जलपर्णीने व्यापले जाऊ लागले आहे. नदी भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नदी आता पूर्णपणे सांडपाणी घेऊनच वाहत आहे अशी अवस्था आहे. नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती सोडून जागेवर आता मोठी मोठी बांधकामे उभी करण्याची वेळ आली आहे. या भागात शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे. काही शेतकरी अद्याप शेती करत आहेत, त्यांच्या पिकाला फेसयुक्त पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकंदरीतच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात भीषण वाढ झाली असून, नदीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र आहे. नदीचे पाणी पिण्यासाठी वापरणे केव्हाच बंद झाले असून, नदीकाठावरील सर्वच गावांतील नागरिक विकतचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.
नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती सोडून जागेवर आता मोठी मोठी बांधकामे उभी करण्याची वेळ आली आहे. या भागात शेती विकण्याचे प्रमाण वाढले आहे. काही शेतकरी अद्याप शेती करत आहेत, त्यांच्या पिकाला फेसयुक्त पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकंदरीतच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात भीषण वाढ झाली असून, नदीचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र आहे. नदीचे पाणी पिण्यासाठी वापरणे केव्हाच बंद झाले असून, नदीकाठावरील सर्वच गावांतील नागरिक विकतचे पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.
मंत्र्यांच्या केवळ भूलथापा
आळंदीत कोणतेही मंत्री आले, की ते इंद्रायणी प्रदूषणमुक्तीसाठी लवकरच काम सुरू होईल असे सांगतात. प्रत्यक्षात मात्र अद्याप काम सुरू नाही. जे सुरू असल्याचे सांगितले जाते ते तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अगोदरचेच अंदाजपत्रक कामातील एसटीपी प्रकल्प आहेत. एमआयडीसीचा नदीसुधार प्रकल्प अद्याप कागदावरच असल्याची टीका अविरत फाउंडेशनचे निसार सय्यद यांनी केली आहे.