

वडगाव मावळ: मावळ परिसरातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमधील अडथळ्यांचा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक उड्डाणे रद्द होत असल्याने गुलाब फुलांच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे पाच दिवसांत तब्बल 50 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुलाबफुलांची शेती केली जाते. येथे पिकणारी फुले देशातील विविध राज्यांसह विदेशातही निर्यात केली जातात. दररोज देशांतर्गत साधारण 40 लाख गुलाब फुलांची वाहतूक केली जाते. त्यापैकी सुमारे 25 टक्के म्हणजेच 10 लाख फुलांची वाहतूक विमानांद्वारे होते. मात्र, इंडिगोच्या उड्डाणांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक आणि नेटवर्कमधील अडचणींमुळे अनेक विमानतळांवर उशीर व रद्दीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
या गोंधळाचा सर्वांधिक फटका गुलाब फुलांच्या वाहतुकीला बसला असून, ताजेपणा टिकवण्यासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असतानाच फुले तासन्तास विमानतळांवर अडकून राहत आहेत. परिणामी ही फुले बाजारात वेळेवर पोहोचत नसल्याने त्यांची झपाट्याने कुजण्याची शक्यता वाढली आहे. किरकोळ बाजारपेठेत गुलाबाच्या एका फुलाची किंमत साधारण 20 रुपये असते. वाहतूक ठप्प झाल्याने रोजचे साधारण 10 लाख फुले बाजारात न पोहोचल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने फुलांची मागणी प्रचंड असते. मात्र, पुरवठा खंडित झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघेही चिंताग्रस्त आहेत. या नुकसानाची भरपाई कोण करणार? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
इंडिगो एअरलाइन्सच्या अनियमित विमान सेवेमुळे माझे गेल्या पाच दिवसांत दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. माझ्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांचे ही मोठे नुकसान झाले आहे. लग्नसराईमुळे दिल्ली, कलकत्ता, गुवाहाटी या ठिकाणी गुलाबांना मोठी मागणी आहेख परंतु गेले पाच दिवस आमचे गुलाब पुणे एअरपोर्टला पडून असल्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तरी शासनाने आमच्या या होणाऱ्या नुकसानीची दखल घेऊन भरपाई द्यावी.
आबासाहेब अळगडे, गुलाब उत्पादक शेतकरी