पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad STEM Tinkering Lab: पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क : शिक्षकांचे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण केंद्र

कल्पक घरातून 1 लाख 30 हजारांहून अधिक शिक्षक व विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला; शाळांमध्ये स्टेम लॅब आणि अटल टिंकरिंग प्रकल्पाला चालना

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कंबळे

पिंपरी : सध्याचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढत आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर तंत्रज्ञान शिकण्यापूर्वीच शाळेतून हे शिकविले, तर त्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या दृष्टीने चांगला फायदा होणार आहे. हे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण घेण्यासाठी चिंचवड येथील सायन्सपार्कमधील कल्पक घरातून अनेक शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे; तसेच वर्षभरात सुमारे 1 लाख 30 हजारांहून अधिक जणांनी कल्पक घरास भेट दिली आहे.(Latest Pimpri chinchwad News)

विद्यार्थ्यांमधील जिज्ञासू वृत्ती व कल्पकतेला चालना मिळून नवकल्पनांचा पुरस्कार करणारे उद्याचे संशोधक घडावेत, या उद्देशाने भारत सरकारने ‌’अटल टिंकरिंग लॅब‌’चे आयोजन केले आहे. या तंत्रज्ञानाने आजूबाजूच्या गोष्टींचा शोध घेऊन त्यावर संशोधन करून नवनिर्मिती करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि यातून भविष्यातील संशोधक निर्माण होणार आहेत. नवीन पिढीमध्ये विज्ञानाचे आकर्षण, तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि नवनिर्मिती याची गोडी निर्माण करण्यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत.

स्टेम टिंकरिंग प्रकल्प

कल्पघर हे आयर पुणे आणि पिंपरी चिंचवड पार्क यांचा संयुक्त स्टेम टिंकरिंग प्रकल्प आहे आणि टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने या उपक्रमाला अर्थसहाय्य केले आहे. कल्पक घरामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांवर आधारित प्रयोग आणि प्रकल्प आहेत. मुख्य आकर्षण म्हणजे अध्यापन शिकण्याची प्रक्रिया सुलभ पद्धतीने केली जाते. जसे की पृथ्वी - चंद्र मॉडेल, विविध ध्वनीवर आधारित प्रयोग, वर्तमानपत्रापासून टोप्या बनवून भूमितीय आकार समजून घेणे, गणितीय कोडी, बेन कॅप, पानाची त्रिमितीय प्रतिकृती यांसारख्या कृतींचा समावेश होता. तसेच, गिअर मेकॅनिक्स आणि कल्पकघरमधील इतर टिंकरिंग लॅब साधनांचा वापर करून स्टेम टिंकरिंग कृतींचे प्रात्यक्षिक पहायला मिळते.

कल्पक घरातील कल्पनांनी बंद लॅब सुरू

खासगी शाळेमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर अशा विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते, तर काही शाळेमध्ये रोबोटिक्स, ॲनिमेशन, थीडी प्रिंटर्स याद्वारे डिझाईन करून दाखविली जातात. पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शासनाची अटल टिंकरिंग लॅब आणि माध्यमिक आणि प्राथमिक अशा सर्व शाळांमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेम लॅब तयार करण्यात आली आहे. ‌’सायन्स, मॅथ आणि टेक्नॉलॉजी यांची एकत्रित ‌’स्टेम लॅब‌’ बनविण्यात आली आहे. यातून महापलिकेचे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, पायथन, कोडिंग शिकविले जाते. मात्र, हे शिकविणाऱ्या प्रशिक्षकांनी शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे होते. हे काही काळापुरते नेमले होते. त्यामुळे आता शाळांमधील बहुतांश लॅबमध्ये मर्यादित प्रकल्प तयार केले जातात. काही वेळेला शिक्षकही उपलब्ध नसतात. तर काही लॅब बंद आहेत. शाळांना या लॅब पुन्हा सुरु करण्यासाठी याठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. त्यासाठी साहित्यदेखील पुरविण्यात येते.

कल्पक घराचा फायदा

ज्या शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी कल्पक घराला भेट दिली त्यांना कल्पक घरातून एक अभ्यास साहित्य देण्यात येते. त्या साहित्यातून शिक्षक आणि विद्यार्थी नवनवीन संकल्पना राबवून प्रकल्प तयार करतात. त्याचे फोटो आणि व्हिडीओ कल्पक घरातील प्रशिक्षकांना पाठविले जातात. फक्त शहरातीलच नाही, तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रकल्पाला भेट दिली आहे.

कल्पक घर 2024 पासून सुरू झाले आहे. आत्तापर्यंत 1300 शिक्षक आणि 6400 विद्यार्थी यांना स्टेम कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिक्षक कल्पकघराशी ऑनलाईन कनेक्ट झाले असून त्यांनी केलेले नवनवीन प्रयोग, संकल्पना आमच्यापर्यंत पोहचवित आहेत. तसेच येथील प्रशिक्षकांकडून देखील त्यांना मार्गदर्शन केले जाते. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी होत आहे.
अंकित तिरपुडे (तांत्रिक अधिकारी, आयसर पुणे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT