

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार सदस्यीय 32 प्रभागाचे अंतिम स्वरूप स्पष्ट झाल्याने निवडणूक मैदान कोण-कोण असणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, फुटलेल्या 1,12, 6, 7, 24 आणि 25 या सहा प्रभागात अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाच्या लोकसंख्येत मोठा बदल झाल्याने त्या प्रभागातील खुल्या गटातील इच्छुकांचे भवितव्य धोक्यात आल्याने नाराजीचा सूर आहे. तेथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र, उर्वरित 26 प्रभाग आहे तसेच ठेवल्याने तेथील माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये आनंदाचे चित्र आहे.(Latest Pimpri chinchwad News)
प्रभागरचना प्रसिद्ध
राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 32 प्रभागाची अंतिम रचना सोमवार (दि. 6) प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभागरचना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
धावडेवस्ती, गव्हाणेवस्तीतील बदल कोणाला मारक ?
भोसरी येथील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत प्रभाग क्रमांक 6 मधून गावजत्रा मैदान व महापालिका रुग्णालय हा परिसर फोडला आहे. तो भाग भोसरी गावठाण, शीतलबाग, गव्हाणे वस्ती प्रभाग क्रमांक 7 ला जोडला आहे. त्यामुळे केवळ 500 लोकसंख्येत फरक झाला आहे. धावडेवस्ती प्रभागाची लोकसंख्या 53 हजार 120 वरून 52 हजार 565 झाली आहे. तर, एस.सी. लोकसंख्या 4 हजार 700 वरुन 4 हजार 648 झाली आहे. एस.टी. लोकसंख्या 1 हजार 800 वरून 1 हजार 749 झाली आहे. तर, गव्हाणेवस्ती प्रभागाची लोकसंख्या 53 हजार 67 वरून 53 हजार 622 ने वाढली आहे. एस.सी. लोकसंख्या 4 हजार 683 वरून 4 हजार 735 झाली आहे. तर, एस. टी. लोकसंख्या 828 वरून 879 झाली आहे. या बदलामुळे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांवर फारसा परिणाम होणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.
शिवसेनेमुळे भाजपा, ठाकरे गट अडचणीत ?
थेरगाव, बेलठिकानगर, बिर्ला रुग्णालय, गुजरनगर प्रभाग क्रमांक 24 मधून म्हातोबानगर फोडण्यात आला आहे. तो परिसर ताथवडे, वाकड, काळा खडक, भुजबळ वस्ती प्रभाग क्रमांक 25 मध्ये जोडण्यात आला आहे. त्यामुळे थेरगाव प्रभागाची लोकसंख्या 50 हजार 243 वरून 47 हजार 528 झाली आहे. एस. सी. लोकसंख्या 7 हजार 47 वरून 5 हजार 969 आणि एस. टी. लोकसंख्या 719 वरुन 1 हजार 122 झाली आहे. ताथवडे-वाकड प्रभागाची लोकसंख्या 49 हजार 964 वरून 52 हजार 679 झाली आहे. एस. सी. लोकसंख्या 10 हजार 770 वरून 11 हजार 848 ने वाढली आहे. एस. टी. लोकसंख्या 1 हजार 105 वरून 1 हजार 122 झाली आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे यांना सुरक्षित प्रभाग व्हावा म्हणून हा बदल केल्याचे बोलले जात आहे. या बदलामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांना एस.सी. जागा राहणार नसल्याने ते अडचणीत आले आहेत. तर, वाल्हेकरवाडी, चिंचवडे नगर प्रभाग क्रमांक 17 मध्ये एस.सी. आरक्षण पडणार असल्याने भाजपाचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके व माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्यापैकी एकालाच खुल्या गटातून लढता येणार आहे. त्यामुळे भाजपाची अडचण वाढली आहे.
सर्व प्रभागात भाजप कार्यकर्त्यांची मोठी ताकद
भारतीय जनता पक्षाची शहरातील सर्वच प्रभागांमध्ये ताकद आहे. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. प्रत्येक प्रभागात आमची चाचपणी सुरू आहे. परंतु, महायुती म्हणून वरिष्ठ पातळीवरती अंतिम निर्णय होईल. काही ठिकाणी रचना बदलेली असली तरी, पक्ष म्हणून सर्वच ठिकाणी आमचे निश्चित प्राबल्य आहे, असे भाजप शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
मनसे जास्तीत जास्त जागा लढणार
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2 ते 3 वर्षांपासून काम करीत आहे. पक्षबांधणी करत संघटन मजबूत केले आहे. प्रभाग अंतिम झाल्याने आता आरक्षण सोडतीकडे आमचे लक्ष लागले आहे. एकूण 128 पैकी जास्तीत जास्त जागा लढविण्यावर आमचा भर आहे. यंदा अधिकाधिक उमेदवारांना महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे मनसेचे शहराध्य सचिन चिखले यांनी सांगितले.
कितीही प्रभाग फोडले तरी, महाविकास आघाडीचा विजय
महायुतीने काही प्रभाग फोडले आहेत. पुन्हा त्यांनी जनतेवर अविश्वास दाखविला आहे. त्यांच्या हिशोबाने प्रभाग बदलले आहेत. इतर ठिंकाणीही त्यांना बदल करायचे होते. मात्र, त्यांना मजले नाही. प्रभाग फोडाफोडीत भाजपाचा वरचष्मा दिसत आहे. महायुतीतील शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलण्यात आहे आहे. प्रभाग रचना कशीही होऊ देत, महाविकास आघाडी 128 जागांवर लढणार आहे. लोकमताच्या जोरावर आघाडीचा विजय होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.
आरपीआय भाजपासोबत निवडणूक मैदानात
पिंपरी-चिंचवड महापालिकेची 32 प्रभागाची रचना अंतिम झाली आहे. केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली शहरात आरपीआय भाजपासोबत पूर्ण ताकदीने लढणार आहे. किमान 15 जागांवर पक्षाचे सक्षम उमेदवार तयार आहेत. त्यादृष्टीने पक्षाने बांधणी तसेच, तयारी केली आहे. आरक्षण सोडतीनंतर प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होईल, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी सांगितले.
चिखलीची लोकसंख्या वाढली तर, थेरगावची घटली
सन 2011 च्या जनगणनेनुसार किमान 49 हजार व कमाल 59 हजार लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्याची अट आहे. मात्र, महापालिकेकडून प्रभाग फोडताना चिखली प्रभागाची लोकसंख्या तब्बल 65 हजार 320 इतकी वाढविण्यात आली आहे. पूर्वी ती 57 हजार 149 इतकी होती. तर, थेरगाव प्रभागाची लोकसंख्या 47 हजार 528 इतकी कमी झाली आहे. पूर्वी ती 50 हजार 243 इतकी होती. लोकसंख्येची मर्यादा ओलांडल्याने प्रभागांच्या फोडाफोडीबाबत नाराज मंडळी न्यायालयात जाण्याची शक्यता वाढली आहे.
तीन प्रभागांतील व्याप्तीतील नावांत समावेश
तीन प्रभागातील व्याप्ती व वर्णनामध्ये भागांचा नावाचा तपशिल समाविष्ट करण्यात आला आहे. प्रभागात संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभाग क्रमांक 10 मध्ये अण्णासाहेब मगर नगर, टिपू सुलतान नगर, बीएसएनएल परिसर, चिंचवडमधील एमआयडीसी ऑफीस हा भाग होता. आता त्या भागांचे नाव समाविष्ट केले आहे. पूर्णानगर, नेवाळेवस्ती, कृष्णानगर, घरकुल प्रभाग क्रमांक 11 मध्ये भिमशक्तीनगरचा समावेश होता. आता त्याचे नावाचा समावेश करण्यात आला आहे. पिंपळे निलख, विशालनगर, कस्पटेवस्ती, वेणूनगर प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाकड भागाचा समावेश होता. त्या नावाचे समावेश करण्यात आले आहे.
खुल्या गटांतील दिग्गजांचा पत्ता कट होण्याची भीती
एकूण 32 पैकी 6 प्रभाग फुटले आहेत. त्यामुळे त्या प्रभागातील अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमातीची (एसटी) लोकसंख्या बदलली आहे. परिसर जोडलेल्या तीन प्रभागांतील त्या वर्गाची लोकसंख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे त्या प्रभागात एससी आणि एसटीचे आरक्षण पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, त्या प्रभागांतील खुल्या गटातील उमेदवारांचा पत्ता कट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खुल्या गटातील जागा न राहिल्याने त्यांना आजूबाजूच्या प्रभागाकडे वळावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना प्रतिस्पर्ध्यांशी तगडी झुंज द्यावी लागणार आहे. तसे, न केल्यास त्यांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागणार आहे.
सहा प्रभाग फोडले
चिखली गावठाण प्रभाग क्रमांक 1 मधून ताम्हाणेवस्ती हा परिसर वगळण्यात आला आहे. तो भाग तळवडे गावठाण, रुपीनगर, त्रिवेणीनगर प्रभाग क्रमांक 12 मध्ये जोडण्यात आला आहे. भोसरीतील धावडेवस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत प्रभाग क्रमांक 6 मधून गावजत्रा मैदान व महापालिका रुग्णालय हा परिसर वगळण्यात आला आहे. तो परिसर भोसरीतील गावठाण, शीतलबाग, गव्हाणे वस्ती प्रभाग क्रमांक 7 मध्ये जोडण्यात आला आहे. बेलठिकानगर, बिर्ला रुग्णालय, पद्मजी पेपर मिल, गुजरनगर प्रभाग क्रमांक 24 मधून म्हातोबा वस्ती वगळण्यात आली आहे. तो भाग ताथवडे, वाकड, काळा खडक, भुजबळ वस्ती प्रभाग क्रमांक 25 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
32 पैकी 6 प्रभागांत बदल
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 32 प्रभागांपैकी केवळ 6 प्रभागात बदल करण्यात आले आहेत. इतर कोणत्याही प्रभागात बदल करण्यात आलेले नाहीत. पूर्वी होते ते तसेच आहेत. तसेच, तीन प्रभागाच्या व्याप्तीच्या वर्णनात त्या प्रभागांतील समाविष्ट भागांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे, असे महापालिकेच्या निवडणूक आयोगाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का ?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल तसेच, त्याच पक्षाच्या माजी महापौर मंगला कदम हे प्रतिनिधित्व करीत असलेले दोन प्रभाग पूर्वीप्रमाणे करावेत, अशी हरकत नोंदविण्यात आली होती. योगेश बहल यांचा संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, कासारवाडी, कुंदनगर प्रभाग क्रमांक 20 आणि मंगला कदम यांचा संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी, दत्तनगर प्रभाग क्रमांक 10 ला संबंध नसलेला परिसर तसेच, झोपडपट्टी जोडण्यात आला आहे. भौगिलिक दृष्टीने प्रभागातील अनेक परिसर एकमेकांशी पूरक नाहीत. त्यामुळे या दोन प्रभागांतील अतिरिक्त जोडलेला परिसर वगळावा, अशी हरकत घेण्यात आली होती. प्रभाग दहाबाबत तब्बल 115 हरकती आणि प्रभाग वीसबाबत 31 हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. मात्र, प्रभाग न फोडता आहे तसेच ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का समजला जात आहे.