

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने सलग सात दिवस अतिक्रमण विरोधी कारवाई करीत चिखलीतील कुदळवाडी भागातील भंगार दुकाने, गोदाम, इतर आस्थापना तसेच, लघुउद्योगांवर कारवाई केली. त्यात एकूण 850 एकर जागा रिकामी करण्यात आली. त्या भागांत चालू विकासकामातूनच विविध आठ डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहे. त्याचा खर्च तब्बल 26 कोटी रुपयाने वाढला आहे. ते काम निविदा न काढता काम करीत असलेल्या चालू ठेकेदारांना बहाल करण्यात येणार आहे.(Latest Pimpri chinchwad News)
महापालिकेने धडक कारवाई करीत कुदळवाडी परिसरातील एकूण 850 एकर जागेतील अनधिकृत बांधकामे व पत्राशेड जमीनदोस्त केले. त्या भागांत डीपी रस्ते तातडीने विकसित न करण्यास महापालिकाचा स्थापत्य विभाग सरसावला आहे. या नव्या रस्त्यांमुळे देहू-आळंदी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. रस्ते तयार न केल्यास जागेवर पुन्हा अतिक्रमण होण्याची भीती महापालिका प्रशासनाला सतावत आहे. त्यामुळे तातडीने रस्ते विकसित करण्यासाठी स्थापत्य विभागाची धावपळ सुरू आहे.
ती कामे क आणि फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या चालू विकासकामातून ती कामे केली जाणार आहेत. त्यासाठी नव्याने निविदा काढली जाणार नाही. ते काम थेट पद्धतीने संबंधित ठेकेदाराला दिले जाणार आहे. त्या कामाची दरसूची सन 2020-21ची आहे. सन 2022-23ची दरसूचीत 20 टक्क्यांची तफावत आहे. त्यानुसार, स्थापत्य विभागाने चालू कामात 20 टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे त्या भागांतील विविध आठ रस्त्यांचा खर्च तब्बल 25 कोटी 91 लाख रुपयांनी वाढला आहे. त्या वाढीव सुधारित खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
आठ नव्या रस्त्यांचा वाढीव खर्च
संत सावतामाळी ते गट क्रमांक 658 ते 30 मीटर डीपी रस्त्यापर्यंत 12 व 18 मीटरचा शिव रस्ता ते सिटी प्राईड स्कूलपर्यंतचा 500 मीटर लांबीचा अधिकचा रस्ता विकसित केला जाणार आहे. त्याचा खर्च 4 कोटी 55 लाखांनी वाढला आहे. शिव रस्ता ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंतचा 30 मीटर डीपी रस्ता विकसित करण्याच्या कामात सिटी प्राईड ते सिल्व्हर जीमपर्यंतचा 500 मीटर लांबीचा अधिकचा रस्ता तयार केला जाणार अहे. त्यासाठी 4 कोटी 91 लाखांचा जास्त खर्च होणार आहे. बोऱ्हाडेवाडीतील उर्वरित डीपी रस्ते विकसित करण्याच्या कामात सिल्व्हर जीम ते वडाचा मळापर्यंतचा 250 मीटर लांबीचा अधिकचा रस्ता केला जाणार आहे.
त्यासाठी 2 कोटी 31 लाखांचा जास्तीचा खर्च आहे. चिखलीतील भैरवनाथ मंदिर ते विसावा चौक ते आळंदीपर्यंतचा 30 मीटर रस्ता विकसित करण्याच्या कामात टाऊन हॉल ते नदीपर्यंतचा 330 मीटर लांबीचा अधिकचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी 4 कोटी 31 लाखांचा खर्च वाढला आहे. पवारवस्ती ते भैरवनाथ मंदिरासमोरील रस्ते पावसाच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकून डांबरीकरण करण्याचा कामात भैरवनाथ मंदिर ते ब्ल्यू वॉटर सोसायटीपर्यंतचा 450 मीटर लांबीचा अतिरिक्त रस्ता तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता 1 कोटी 14 लाखांचा अधिकचा खर्च अपेक्षित आहे. नागेश्वरनगर, गायकवाडवस्ती व उर्वरित परिसरातील रस्ते अद्ययावत पद्धतीने विकसित करण्याचा कामात ब्ल्यू वॉटर सोसायटी ते रिव्हर रेसिडेन्सीपर्यंतचा 500 मीटर लांबीचा अधिकचा रस्ता केला जाणार आहे. त्या नव्या कामासाठी जास्तीचा 1 कोटी 73 लाखांचा खर्च होणार आहे.
चिखली चौक ते सोनवणेवस्तीकडे जाणाऱ्या 24 मीटर रुंद रस्ता विकसित करण्याच्या कामात कुदळवाडी नाला ते आकुर्डी रस्ता विकसित करण्याचा कामात कुदळवाडी नाला ते आकुर्डी रस्ता हा 230 मीटर लांबीचा रस्ता तयार केला जाणार आहे. त्याकरिता 3 कोटी 45 लाखांचा अधिकचा खर्च होणार आहे. चिखलीतील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते संतपीठाकडे जाणाऱ्या 18 मीटर रुंद डीपी रस्ता व इतर डीपी रस्ते विकसित करण्याच्या कामात मोरे पाटील चौक ते यादव शेतीपर्यंतचा 350 मीटर लांबीच्या रस्ता तयार केला जाणार आहे. त्यासाठी 3 कोटी 51 लाखांचा जास्तीचा खर्च होणार आहे.