मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड उद्योनगरीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगात वाटचाल सुरू आहे. असे असताना शहरात निगडी ते दापोडी मार्ग सोडल्यास मेट्रोचा नवीन एकही मार्ग झालेला नाही. मात्र, शेजारच्या पुणे शहरात नवीन मार्गाचा अक्षरश: वर्षाव केला जात आहे. केंद्र व राज्य शासनाकडून नवनवीन मार्गांची घोषणा करण्यात येत आहे. त्यावरुन पिंपरी-चिंचवड शहराकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसत आहे.
शहरात सध्या दापोडी ते पिंपरी या 7.5 किलोमीटर अंतरावर मेट्रो धावत आहे. तो मार्ग पुण्यातील स्वारगेटपर्यंत जातो. त्या मार्गावर पिंपरी-चिंचवड शहरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गाच्या उत्पन्नाची तुलना केल्यास महामेट्रोला पिंपरी मेट्रो स्टेशनवर विक्रमी उत्पन्न मिळत आहे. पिंपरीपासून निगडीपर्यंत असे 4.5 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. तो मार्ग झाल्यानंतर दापोडी ते निगडी या शहराच्या मध्यवर्ती मार्गावरुन मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
असे असले तरी, शहरात नवीन मेट्रो मार्गाची घोषणा झालेली नाही. राज्य व केंद्र सरकारने शहराला नवीन मेट्रो मार्ग देण्याच्या कोणत्याही हालचाली नाहीत. महामेट्रोने कासारवाडीच्या नाशिक फाटा ते चाकण निओ मेट्रोचा डीपीआर केला होता. त्याला राज्य व केंद्र सरकारने प्रतिसाद न मिळाल्याने तो डीपीआर रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यानंतर महामेट्रोने निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प ते चाकण या 40.926 किलोमीटर अंतराचा 10 हजार 383 कोटी 89 लाख रुपये खर्चाचा डीपीआर तयार केला आहे. त्यात सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अजून तो मार्ग कागदावरच आहे.
पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडूनही (पीएमआरडीए) पिंपरी-चिंचवड शहराबाबत भेदभाव करण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या 23.3 किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग तयार करण्यात येत आहे. त्या मार्गावरील एकूण 23 स्टेशनपैकी एकही स्टेशन पिंपरी-चिंचवड शहरात नाही. त्या मार्गात जाणीवपूर्वक पिंपरी-चिंचवड शहराला वगळण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तर, शेजारच्या पुण्यात पुणे महापालिका, राज्य व केंद्र शासनाकडून वारंवार नवीन मेट्रो मार्गाची घोषणा करण्यात येत आहे. पुणे शहरात नवीन तसेच, विस्तारीत मेट्रो मार्गाचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यात चारी बाजूस मेट्रोचे जाळे तयार होणार आहे.
स्वारगेट ते कात्रज या 5.46 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गाची सुधारित निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. स्वारगेट ते खडकवासला, हडपसर- खराडी, एसएनडीटी ते वारजे-माणिक बाग, रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी), वनाज ते चांदणी चौक, शिवाजीनगर ते हडपसर हे एकूण 62 किलोमीटर अंतराचे 6 नवे मेट्रो मार्ग पुण्यात होणार आहेत. त्या मार्गाच्या डीपीआरलाही पुणे महापालिकेने मंजुरी दिली आहे. तसेच, हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन या 16 किलोमीटर अंतराच्या मार्गानाही पुणे महापालिका तसेच, राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हा तब्बल 90 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा मेट्रो मार्ग आहे. त्यातून पुणे शहरात मेट्रोचे जाळे तयार होत आहे. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मेट्रो मार्गात पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर मागे पडू शकतो.
पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ 7.5 कि.मी.ची मेट्रो
पुणे मेट्रो प्रकल्पातील 33.28 किलोमीटर अंतरापैकी पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी असा केवळ 7.5 किलोमीटर अंतर मेट्रो धावत आहे. एकूण 30 पैकी केवळ 6 मेट्रो स्टेशन शहरात आहेत. या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड व पुणे शहर मेट्रोने एकमेकांना जोडले गेले आहेत. मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मेट्रो दोन्ही मार्गात पिंपरी स्टेशनवरून सर्वांधिक उत्पन्न मिळत आहे. लोकांच्या आग्रहामुळे पिंपरीपासून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या 4.5 किलोमीटर अंतराचा मेट्रोचा विस्तारीत मार्ग तयार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात तो मार्ग सुरू होण्यास किमान दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. तर, निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण मार्गाचा डीपीआर अद्याप कागदावर आहे. तर, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाही त्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी निधीची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
शहरातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ?
पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेचे श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे असे दोन खासदार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आहेत. भाजपचे महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे असे भाजपाचे चार आमदार आहेत. झपाट्याने वाढत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला मेट्रोच्या नव्या मार्गाची अत्यंत गरज आहे. त्याबाबत सामाजिक संघटनांकडून मागणीही केली जात आहे. त्या मागणीकडे शहरातील लोकप्रनिधींकडून राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात यश मिळत नसल्याचे चित्र आहे. तर, काही लोकप्रतिनिधींकडून त्याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप केले जात आहेत.
महामेट्रोकडून निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून ते चाकण या मार्गाचा डीपीआर तयार करण्यात आला आहे. त्यात काही सुधारणा करण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव आले आहेत. त्यानुसार, सुधारित डीपीआरचे काम सुरू आहे. राज्यानंतर केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करता येईल. तसेच, पिंपरी ते निगडी या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे.श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो