

उर्से मावळ: बेबडओहळ येथील एका कंपनीच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. कंपनीचे हे पाणी कुठलीही प्रक्रिया न करता नाल्यामध्ये सोडले जात आहे. हेच नाल्याचे पाणी येथील जनावरे पित असल्यामुळे त्यांना वेगवेगळे आजार होत आहेत तसेच, हे पाणी पुढे जाऊन पवना नदीत मिसळत आहे व हेच पाणी गावाला पिण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे ग्रामस्थांनी लवकरात लवकर नाल्यात सोडले जाणारे दूषित पाणी थांबवावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शेती पिकांचे नुकसान
गंगा पेपर मिल कंपनीकडून केमिकल युक्त पाणी शेतात गेल्याने मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होत आहे. तसेच, शेतजमीन नापीक होत आहे. या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाबतीत बेबडओहळ ग्रामपंचायतीने वेळोवेळी कंपनीच्या अधिकार्यांशी संपर्क करून त्यांच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या आहेत व प्रदूषण नियंत्रण मंडळातसुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला नोटीस बजावली होती. तरीसुद्धा कंपनीकडून वारंवार दूषित पाणी नाल्यात सोडले जात आहे. प्रशासन आणि संबंधि कंपनीकडून याकडे दुर्लक्ष्ा केले जात असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजय घारे, बाळासाहेब घारे, छबन घारे, त्रिंबक घारे, मधुकर घारे, मनोज घारे, भरत घारे, राजेंद्र घारे, आनंद घारे, प्रदीप घारे, अभिषेक शिळीमकर आदी शेतकऱ्यांच्या शेत जमीनीचे नुकसान झाले आहे.
तसेच, यांची जनावरेसुद्धा रोगराई ग्रस्त होत आहेत. त्यामुळे कंपनीने त्वरित हे पाणी बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रार करूनही कंपनीकडून याकडे वारंवार दुर्लक्ष्ा केले जात असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्र शासनाच्या नियमानुसार प्रदूषित पाणी नदी नाल्यात सोडू नये हा नियम असतानासुद्धा कंपनीकडून पाणी सोडले जात आहे. आम्ही वारंवार सूचना करूनसुद्धा कंपनी दूषित पाणी सोडत आहे. दरवेळी कंपनीच्या आडमुठेपणाची भूमिका घेत आहे. कंपनीने या पुढे नाल्यात एक थेंबसुद्धा पाणी सोडू नये. जर कंपनीने अशीच आडमुठेपणाची भूमिका घेतली तर बेबडओहळ ग्रामपंचायतीच्या व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.
तेजल घारे, सरपंच, बेबडओहळ
सांडपाणी कंपनीकडून सोडले जात नाही हे पाणी आम्ही टाकीत साठवून ठेवतो व त्याचा पुर्नवापर करण्यात येतो. या साठवलेल्या पाण्याच्या साठ्याचा रिपोर्ट दररोज मागविण्यात येत असतो. तसेच, या पाण्याच्या पुनर्वापराकरिता कंपनीने क्रोफ्टा प्लान्ट लावलेला आहे व प्रेसराईज डिश फिल्टर प्लान्टसुद्धा लावलेले आहेत, जे पाणी नाल्यामध्ये सोडले गेले ते कोणीतरी जाणूनबुजून सोडले आहे, असा आमचा संशय आहे. या बाबतीत कंपनी कडक कारवाई करणार आहे. तसेच, पुढे या बाबतीत योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.
व्ही. एस. व्दिवेदी, जनरल मॅनेजर गंगा पेपर मिल