

पिंपळे गुरव: सध्या पतंग उडविण्याचा हंगाम जवळ येत आहे. पतंग उडवणे हा मुलांमध्ये आणि प्रौढांमध्येही अत्यंत लोकप्रिय खेळ आहे. मात्र, पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात काही लहान मुले पतंग उडविताना दिसून आली. रहदारीच्या मार्गावर पतंग उडविल्याने नागरिकांसह वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. परंतु नागरिकांच्या सतर्कतेने अपघात टळण्यास मदत झाली.
सृष्टी चौकडावर पतंग अडकलेला पाहून काही लहान मुले तो काढण्यासाठी रस्त्याच्या अगदी कडेला उभी राहून जीव धोक्यात घालत होती. चौकातील रस्त्यावर उभे राहून ते दोराच्या साहाय्याने पतंग खाली आणण्याचा प्रयत्न करत होते.
त्याचवेळी रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती. त्यामुळे पतंगाचा तीक्ष्ण मांजा वाहनचालकांच्या शरीराला किंवा मानेला लागून गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सृष्टी चौक हा पिंपळे गुरव परिसरातील सर्वाधिक वर्दळीचा भाग असून याच ठिकाणातून भोसरी, कासारवाडी, दापोडी, पिंपळे सौदागर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अशा गर्दीच्या भर चौकात पतंग काढण्याच्या नादात आपण रस्त्यावर उभे आहोत याचे भान मुलांना नव्हते. यापूर्वीही पतंगाच्या मांजामुळे दुचाकीस्वार तसेच पादचारी नागरिकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मात्र, लहान मुलांना या धोक्याचे गांभीर्य समजत नाही. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी मुलांना समज देत अशा प्रकारे रस्त्यावर उभे राहून पतंग काढणे योग्य नसल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ मुलांना तेथून दूर केले व संभाव्य अपघात टळला.
मुलांना खेळाची आवड आहे पण त्यांना वाहतुकीचे भान राहिले पाहिजे. आम्ही शाळेत सतत रस्ते सुरक्षिततेचे धडे देतो, पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात अत्यंत गंभीर असतात. मुलांना हे समजेल असे शिक्षण देणे आता काळाची गरज आहे.
चक्रधर साखरे, शिक्षक