

पुणे/ पिंपरीः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या मुंढवा येथील 40 हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दस्त नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम निबंधकाला बावधन पोलिसांनी रविवारी (दि . ७) अटक केली. भोर येथील त्याच्या निवासस्थानावरून त्याला याला ताब्यात घेण्यात आले. रवींद्र बाळकृष्ण तारू (वय ५८, रा. भोर) असे अटक केलेल्या दुय्यम निबंधकाचे नाव आहे.
याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 अधिकारी संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी तारु याला अटक केल्यानंतर (दि. ८) पौड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे सरकारी वकील म्हणून नितीन अडागळे यांनी काम पाहिले.
दरम्यान, या जमीन गैवरव्यवहार प्रकरणात कुलमुखत्यारधारक असलेली महिला शीतल किशनचंद तेजवाणीला गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तिला खडक पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, सद्या ती पोलिसांच्या कोठडीत आहे. तहसिलदार सुर्यंकात येवले, दिग्विजय पाटील याच्यावर हा गुन्हा दाखल आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यारधारक असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २० मे २०२५ रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. ४ येथे हा व्यवहार झाला होता. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी परस्पर संगनमत करून मुंढवा येथील या जमिनीच्या सातबारा उतार्यावर भोगवटदाराचे नाव 'मुंबई सरकार' असल्याचे माहिती असतानाही व आवश्यक शासन परवानगी न घेता व्यवहार केला. आरोपींनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे ६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बावधन पोलीसांनी रविवारी याप्रकरणातील आरोपी सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला भोर येथील राहत्या घरातून अटक केली. सोमवारी तारू याला पौड न्यायालयात हजर करण्यात आले. जमीन व्यवहाराची दस्त नोंदणी करताना तारू यांनी कोणकोणत्या कागदपत्रांची पडताळणी केली, याबाबत त्यांच्याकडे चौकशी करायची असल्याने बावधन पोलीसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तारू यांना आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी दिली.
बावधन पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात कागदपत्रांची तपासणी केली असता या प्रकारातील दस्त नोंदणी रवींद्र तारू यांच्या अधिकारात झालेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, त्यांना अटक केली आहे. भोर येथील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच, या प्रकरणातील दुसरी महिला आरोपी शितल तेजवानी ही सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. आम्ही लवकरच त्यांना ताब्यात घेणार आहोत.
विशाल गायकवाड (पोलीस उपायुक्त)