

बाबांना समाजसेवेचे, संघर्षाचे बाळकडू त्यांचे आजोबा विठ्ठल सखाराम झेंडे (आईचे वडील) यांच्याकडून मिळाले. बाबांच्या वडिलांचे निधन ते लहान असतानाच झाल्याने त्यांचे संगोपन आईच्या माहेरी झाले. तब्बल सात दशके त्यांनी गरीब कष्टकऱ्यांसाठी आवाज उठविण्याचे काम केले. त्याचे बाळकडू त्यांना जसे आजोबांनी दिले तसेच त्यांच्या आयुष्यातील समाजवादी नेत्यांनी दिले. तोच आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला आणि नव्या पिढीला सांगितला.
अन्वर राजन
डॉ. बाबा आढाव यांची ओळख असंघटित कामगारांचे नेते अशी आहे. तसेच त्यांची दुसरी ओळख महात्मा फुले यांचे परिवर्तनाचे विचार पुढे नेणारे प्रणेते अशीही आहे. बाबा आढाव यांनी आपल्या सामाजिक कामाची सुरुवात हडपसर येथे ग््राामीण भागातील नागरिकांसाठी रुग्णालय उभे करून केली. दादा गुजर यांच्या सोबत सुरू केलेली संस्था आजही कार्यरत आहे. पण, बाबा त्या कामात फार रमले नाहीत.
बाबांना चळवळीत जास्त रस होता. नाना पेठेत रहात असताना, त्या परिसरातील बाजारपेठेतल्या हमालांचे जगणे त्यांना दिसत होते. नाना पेठेतील दवाखान्यात येणाऱ्या पेशंट्समध्ये हमालांची संख्या मोठी होती. रास्त दरात उपचार उपलब्ध करून देण्याचे काम बाबांनी केले. याच परिसरातून बाबा दोन वेळा पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे खेड मतदार संघातून समाजवादी पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली. पण त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडायचा निर्णय घेतला.
माझे वडील भवानीपेठेतील एका गुळाच्या दुकानात दिवाणजी म्हणून काम करत होते. त्या दुकानातील हमाल अधूनमधून आमच्या घरी येत. वडिलांच्या तोंडून हमाल पंचायत आणि हमालांचे आंदोलन या विषयी चर्चा कानावर पडायची. कालांतराने बाबांची ओळख झाली आणि दीर्घकाळ बाबांचा स्नेहही लाभला. हमालांचं काही काळ आधीचं जगणं आणि आत्ताच जगणं यातील फरक मी स्वतः पाहिला आहे. हमालांच्या जीवनात आमूलाग््रा बदल करण्याचं श्रेय बाबांनाच आहे. हमालांना कामाची हमी, हमालीचे दर निश्चित करणे. हमाल-मापाडी मंडळ स्थापन केल्यानंतर त्याच्यामार्फत हमालांना बोनस मिळवून देणे याचे श्रेय बाबांना जाते. मार्केट यार्ड येथे हमालांना स्वतःचे घर मिळवून देण्यात बाबांना यश आले. हमालांच्या पाठीवर ओझे किती असावे, याचा देखील बाबांनी एक डॉक्टर म्हणून विचार केला. पूर्वी धान्याचे आणि साखरेचे पोते 100 किलोचे असायचे.
हे पोते पाठीवर घेऊन ट्रकमधून गोदामात आणि गोदामातून ट्रकमध्ये चढवण्याचे काम हमाल करायचे. त्यातून त्यांना मणक्याचे आजार होऊ लागले. त्यातून पुढे पोत्याचा आकार कमी करण्यातही बाबांनी यश मिळवले. आज बाजारात धान्याची व साखरेची पोती 25 किलोचे दिसतात. हे बाबांमुळेच घडू शकले. हमाल पंचायतच्या जोडीला बाबांनी बांधकामक्षेत्रातील मजुराना संघटित करून बांधकाम मजूर पंचायत स्थापन केली. बांधकाम कामगारांना त्यांचे अधिकार व जोखमीचे काम असल्याने त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी बाबा प्रयत्नशील राहिले. रिक्षा पंचायत, मोलकरीण संघटना, काच, कागद, पत्रा पंचायत या प्रकारच्या विविध क्षेत्रातील श्रमिकांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ बनवून दिले. बाबांच्या या कामाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. अरुणा रॉय सारख्या लढाऊ नेत्यादेखील या कामी बाबांच्या सोबत उभ्या राहिल्या.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव बाबांवर होता. सत्यशोधक विचार त्यांना त्यांच्या मातुल कुटुंबाकडून मिळाले. म. फुलेंच्या विचारांवर आधारित अनेक आंदोलने व उपक्रमे बाबांनी हातात घेतली. त्यातील ‘एक गाव एक पाणवठा’ ही एक महत्त्वाची मोहीम बाबांनी राज्यभर राबवली व अनेक गावांमध्ये पाणवठे सर्वांसाठी खुले करण्यात यश मिळवले. 1972-73 मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना पंढरपूर येथे मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते. त्यात हजारो किलो धान्य व तूप वापरण्यात येणार होते. बाबांनी त्या विरोधात आंदोलन केले आणि तुरुंगवास पत्करला. या वेळी त्यांच्या सोबत तुरुंगात हमीद दलवाई आणि डॉ अरुण लिमये पण होते. पंढरपूरला जाणाऱ्या पालखीच्या दिंडीमध्ये जातीच्या उतरंडीप्रमाणे क्रम लावण्याचा प्रघात होता. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव विधानसभेने केला होता आणि नंतर त्याची अंमलबजावणी करण्यास शासनाने चालढकल केली. मराठवाड्यात ठिकठिकाणी दलितांच्या
विरोधात हिंसाचार झाला. त्याविरुद्ध पण बाबांनी आवाज उठवला. नामांतराचा आग््राह धरणाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली, तुरुंगवास आणि अटक पत्करली. हे आंदोलन करणाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये बाबा आढाव हे अग््रास्थानी होते. 1975 ते 1977 या काळात आणीबाणीत बाबा आढाव येरवडा कारागृहात स्थानबद्ध होते. त्या काळात मीही तुरुंगात होतो. या काळात मला त्यांचा दीर्घकाळ सहवास लाभला. महात्मा फुलेंचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी महात्मा फुले प्रतिष्ठानची स्थापना केली. तसेच महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला कार्यान्वित केले.
महात्मा फुले यांचे घर असलेल्या जागेत त्यांचे स्मारक व्हावे, या दृष्टीने बाबांनी विशेष प्रयत्न केले. फुलेंचे साहित्य समग््रा वाङ्मय महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले त्यात बाबांचा मोठा वाटा आहे. 1977 मध्ये महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग््राहाला पन्नास वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने झालेल्या बैठकीत विषमता निर्मूलन परिषदेची स्थापना करण्यात आली. या बैठकीचे निमंत्रक बाबा आढाव होते. या बैठकीमध्ये अनेक मान्यवरांच्या समवेत मी पण उपस्थित होतो. या परिषदेतर्फे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विषमता निर्मूलन शिबिरे आयोजित करण्यात आली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कामामध्ये आणि हे नाव सुचवण्यामध्ये देखील बाबांची भूमिका महत्त्वाची होती. महाराष्ट्रामध्ये विविध भागांत अनेक कार्यकर्ते परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय आहेत, त्या कार्यकर्त्यांना समर्थन, मान्यता आणि आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे, असे अनेकांना वाटत होते.
डॉक्टर राम आपटे, कुमार सप्तर्षी, गं. बा. सरदार यांनी या प्रकारच्या सूचना केल्यात. त्यातून सामाजिक कृतज्ञता निधी अस्तित्वात आला. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कृतज्ञता निधीने फार मोठे उल्लेखनीय कार्य केले आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानतर्फे संशोधनाचे काम देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. महात्मा फुलेंचे सहकारी आणि सत्यशोधक चळवळीतील अनेक नेत्यांचे प्रकाशित आणि अप्रकाशित लिखाण शोधून ते प्रकाशित केले. सावित्रीबाई फुले यांचे मूळ छायाचित्र मिळवण्यात यातील संशोधकांना यश आले. विषमता निर्मूलन परिषद, फुल-आंबेडकर व्याख्यानमाला आणि इतर कार्यक्रमातून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तनाचे विचार लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचे कार्य बाबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पार पडले.
आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही हे वसंत बापट यांचे गीत, स्त्री पुरुष सगळे कष्टकरी व्हावे, निर्मिकाने जर एक पृथ्वी केली आणि सत्य सर्वांचे आदिघर, सर्व धर्मांचे माहेर हे महात्मा फुले यांचे हे तिन्ही अखंड(म.फुले यांनी प्रचलित केलेले काव्यप्रकार) बाबा आपल्या खणखणीत आवाजात म्हणत व उपस्थितांकडून म्हणवून घेत असत.
आकाशवाणीवर इतर भजनाप्रमाणे महात्मा फुले यांचे अखंड ही सादर करावेत, असे प्रयत्न बाबांनी केले. हमाल पंचायत आणि विविध कामगार संघटना बाबांनी आपल्या आयुष्यात पूर्ण ताकदीने उभ्या केल्या. हमाल पंचायतीच्या जोडीने ‘कष्टाची भाकर’ हाही उपक्रम यशस्वीपणे राबवला. 1971-1972 मध्ये पुण्यात दंगल झाली असताना कसबा पेठेत काका वडके आणि नंदू घाटे यांच्या बालेकिल्ल्यात बाबा आढाव यांनी हमालांचा मोर्चा नेला आणि दंगली करणाऱ्यांना कडक इशारा दिला. समतेच्या विचाराने वाटचाल करीत असताना, त्यांच्या मागे सामर्थ्य उभे करावे लागते, हे बाबांनी आपल्या वेगवेगळ्या आंदोलनातून सिद्ध करून दाखवले. कामगार चळवळ करणारे अनेक पुढारी होऊन गेले आणि आहेत, त्याचप्रमाणे प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये पण अनेक दिग्गज कार्यरत आहेत. पण दोन्ही क्षेत्रात एकाच वेळी समर्थपणे उभे राहण्याचे काम बाबा आढाव यांचे होते. बाबांचे आयुष्य परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणादायी आहे.
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत.)