मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज 1 हजार 300 ते 1 हजार 400 टन कचरा मोशी येथील कचरा डेपोत जमा केला जातो. लोकवस्ती झपाट्याने वाढत असल्याने दिवसेंदिवस कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे डेपोत कचऱ्याचे उंचच उंच डोंगर तयार होत आहेत. भविष्यात कचऱ्याची समस्या गंभीर होऊ नये, म्हणून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून घरगुती ओल्या कचऱ्यापासून बायो-सीएनजी (जैव-मिथेनेशन) प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; तसेच दररोज 27 मेगा वॅट वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्पाचा आराखडा तयार झाला आहे. या दोन पर्यावरणपूरक प्रकल्पांद्वारे कचरा समस्येवर तोडगा काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
मोशी कचरा डेपोत गेल्या 36 वर्षांपासून कचरा साचला आहे. एकूण 81 एकर क्षेत्रातील डेपोत कचऱ्याचे डोंगर उभे झाले आहेत. तो कचरा बायोमायनिंगद्वारे कमी केला जात आहे. वेस्ट टू एनर्जीद्वारे दररोज 14 मेगा वॅट वीजनिर्मिती होत आहे. त्यासाठी दररोज 700 टन सुका कचरा जाळला जात आहे. निर्माण होणाऱ्या राखेतून खत तयार केले जात आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्याने महापालिकेने आणखी एक वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तो नवा प्रकल्प 27 मेगा वॅट क्षमतेचा असणार आहे. त्यात दररोज 1 हजार टन सुका कचरा जाळला जाणार आहे.
प्रकल्प डीबीओटी (बांधा- वापरा- हस्तांतरित करा) या तत्त्वावर उभारला जाणार आहे. त्यासाठी 1 हजार 50 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी 1 हजार 500 टन क्षमतेचे मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एआरएफ) केंद्र उभारले जाणार आहे. त्या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, तेथीलही वीज महापालिकेस अल्पदरात प्राप्त होणार आहे. प्रकल्पासाठी महापालिकेचा 150 ते 200 कोटी रुपयांचा हिस्सा असणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे.
तर, दुसरीकडे मोशी डेपोत दररोज 400 ते 450 टन जमा होणाऱ्या घरगुती ओल्या कचऱ्यापासून बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याची निविदा पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. तो प्रतिदिन 375 टीपीडी क्षमतेचा प्रकल्प असणार आहे. प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत 2.0 अंतर्गत 67 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. तो प्रकल्प टप्प्याटप्प्याने 500 टीपीडी क्षमतेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या दोन प्रकल्पांमुळे घरगुती ओला कचरा, तसेच सुका कचऱ्याची समस्या सुटण्यास सहाय होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
वेस्ट टू एनर्जी, बायो-सीएनजी प्रकल्पातून सुका कचरा व हॉटेल वेस्टची विल्हेवाट
मोशी डेपोत सुक्या कचऱ्यापासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू आहे. त्यातून दररोज 700 टन सुका कचरा जाळून 14 मेगा वॅट वीजनिर्मिती केली जात आहे. तर, हॉटेल वेस्टपासून 50 टीपीडी क्षमेतच्या बायो सीएनजी प्रकल्पात दररोज 2 हजार किलो सीएनजी तयार होत आहे. तो सीएनजी पंपचालकांना विकला जात आहे. या दोन प्रकल्पांतून सुका कचरा तसेच, शहरातून जमा होणाऱ्या हॉटेल वेस्टची विल्हेवाट लावली जात आहे.
बायो-सीएनजी प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध
घरगुती ओल्या कचऱ्यापासून बायो सीएनजी निर्मितीचा प्रकल्प मोशी कचरा डेपोत उभा करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. त्या प्रकल्पास केंद्र शासनाकडून 67 कोटी 50 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येईल. तसेच, 27 मेगा वॅट वीजनिर्मितीचा प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला आहे. प्रकल्पाच्या निधीसाठी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रकल्पांमुळे पर्यावरण व आरोग्यावर होणारे दुष्पपरिणाम टाळता येणार आहेत, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
..असा असेल बायो-सीएनजी प्रकल्प
क्षमता- 375 डीपीडी
दररोज जमा होणारा घरगुती ओला कचरा- 400 ते 450 टन
केंद्राकडून अनुदान-67 कोटी 50 लाख रुपये
प्रकल्पाचा कालावधी-15 वर्षे
निविदा प्रसिद्ध
..असा असेल वेस्ट टू एनर्जी प्रकल्प
क्षमता-एक हजार टन सुका कचरा
वीजनिर्मिती-दररोज 27 मेगा वॅट
मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी केंद्राची क्षमता-1 हजार 500 टन
महापालिकेचा खर्च हिस्सा- 150 ते 200 कोटी रुपये
डीपीआर तयार
एकूण खर्च -1 हजार 50 कोटी रुपये