

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष टिपेला पोहोचला आहे. शहरात मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध लावताना नेमके काय करावे. यावर ऑस्ट्रेलियातून आलेल्या तज्ज्ञांनी पुणे वन विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. बिबट्याला पकडताना काय काळजी घ्यावी यावर त्यांनी चार गोष्टी युक्तीच्या सांगितल्या.
जुन्नर ते पुणे शहर असा बिबट्याचा प्रवास सुरू होऊन पंधरा दिवस झाले. लोहगाव विमानतळ, पाषाणमधील सिंध, आरबीआय कॉलनी, बावधन आणि दोनच दिवसांपूर्वी पुन्हा काही भागात सीसीटीव्हीवर झालेले दर्शन यामुळे नागरिकांत भीती आहे. तसेच अफवांचे पेव फुटल्याने दररोज वनाधिकारी हैराण होते. बिबट्यासाठी जंग जंग पछाडून थकलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी खास ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचे प्रशिक्षण दोन दिवसांपूर्वी ठेवण्यात आले होते.
४० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना दिले प्रशिक्षण,पुण्याचे वनसंरक्षक आशीष ठाकरे व रेस्क्यू संस्थेच्या पुढाकाराने प्रशिक्षण सत्र संपन्न झाले. या सत्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, जुन्नर, पुणे आणि सोलापूर विभागातील ४० हून अधिक वन अधिकारी सहभागी झाले होते. हे अधिकारी वनहद्दी व्यवस्थापन, मानव-वन्यजीव संघर्ष आणि संघर्षग्रस्त भागांमध्ये सक्रियपणे काम करत आहेत. दक्षिण आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध (लेगसी वाइल्डलाईफ फाउंडेशन आणि व्हट्रेक्स, दक्षिण आफ्रिका) वन्यजीव कॅप्चर ऑपरेशन तज्ज्ञ या सत्रासाठी उपस्थित होते.
- वन्यजीव तज्ज्ञ हाइन शोमन, डॉ. जोसेफिन स्कारुप पिटरसन यांनी मार्गदर्शन केले.
-जागतिक पातळीवरील वन्यजीव व्यवस्थापन, मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या पद्धती, वन्यजीव संख्या नियंत्रण आणि वन्यप्राणी सुरक्षित कसे पकडले जातात यावर प्रकाश टाकला.
- पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देत बिबट्याचे फोटो दाखवत. वन्यजीव मानवी वस्तीत आले तर कसे हाताळावे याचे प्रशिक्षण दिले.
-प्रामुख्याने प्रत्यक्ष घटनास्थळावरची स्थिती कशी हाताळावी, वनहद्दी व्यवस्थापन, वन्यप्राण्यांची काळजी आणि परिसंस्था पातळीवरील व्यवस्थापन यावर त्यांनी भर दिला.
-वन अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सखोल तांत्रिक चर्चा यामुळे सत्र रंजक ठरले.
दक्षिण आफ्रिकेची परिस्थिती, प्रजाती आणि इतिहास आपल्यापेक्षा वेगळा आहे. तरीही काही तत्त्वे, धोरणे कार्यपद्धती आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. हाइन आणि डॉ. जोसेफिन यांनी शेअर केलेले अनुभव आमच्या कामासाठी उपयुक्त ठरतील. अशा प्रकारचे प्रशिक्षण आमच्या वन कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
आशीष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे
ज्ञानाची देवाणघेवाण केल्याने आपली विचारसरणी अधिक व्यापक होते. प्रत्यक्ष कामात योग्य निर्णय घेण्यास मदत होते. अशा संवादातून आपण वेगवेगळ्या देशांतील तज्ज्ञांशी संबंध निर्माण करू शकतो.
तुहीन सातारकर, संचालक, रेस्क्यू संस्था