पिंपरी : दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करीत भाजपाने या प्रभागातील पक्षाचे पॅनेल बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. तिकीट मिळण्याची खात्री नसल्याने पक्षातील इतर इच्छुक नाराज झाले आहेत. त्यामुळे पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. त्यात राष्ट्रवादी काँग््रेास, शिवसेनेने पर्यायी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपातील आयारामांना मतदार स्वीकारणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या प्रभागात गेल्या निवडणुकीत भाजपाच्या दोन नगरसेविका, राष्ट्रवादी काँग््रेास व शिवसेनेचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. भाजपाने राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे हे दोन्ही माजी नगरसेवक फोडत आपल्या तंबूत घेतले आहेत. त्यामुळे भाजपाचे पॅनेल प्रबळ झाल्याचा दावा केला जात आहे; मात्र भाजपातील इच्छुकांची नाराजी वाढली असून, पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. भाजपाकडून माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर तसेच, राजू मिसाळ, अमित गावडे, धनंजय काळभोर, माजी महापौर आर. एस. कुमार, अमोल थोरात, हर्षदा थोरात हे इच्छुक आहेत.
शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) सरिता अरुण साने, राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाकडून श्रीमंत जगताप, मनसेकडून चंद्रकांत दानवले, रोहित बंगाळे, स्वाती दानवले तसेच, ओंकार पाटोळे, अरुण थोरात हे इच्छुक आहेत.
हरित तसेच, बंगलो, बैठी घरे, हाऊसिंग सोसायटी, इमारती असलेला हा परिसर आहे. तसेच, अनेक शाळा व महाविद्यालय या प्रभागात आहेत. विद्यार्थिनीची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या त्रास वाढला आहे. हरित सेतू प्रकल्पात पदपथ मोठे केल्याने वाहतूक कोंडीचा त्रास वाढल्याचा आरोप केला जात आहे. आरक्षित भूखंडाचा विकास करण्यास दुर्लक्ष केले जात आहे. ठराविक भागांत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. गंगानगर, सेक्टर क्रमांक 27 व 28 भागात कमी दाबाने पाणी येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र नाही. रस्त्यावर लावलेली वाहने फोडण्याचे प्रकार होत आहेत. नियमितपणे स्वच्छता केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. येथील नागरी सुविधांचा दर्जा खालावला आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने रहिवासी हैराण आहेत. रिडेव्हल्पमेंटमध्ये जुन्या बंगल्यांच्या जागी मोठ्या इमारती बांधला जात असल्याने नागरी सुविधांचा ताण वाढत आहे. दुरुस्तीअभावी रस्ते खराब झाले आहेत. वेगवेगळ्या कारणांनी झाडांची कत्तल केली जात आहे.
आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूकनगरी, निगडी-प्राधिकरण, सेक्टर क्रमांक 24, 25, 26, 27, 27अ, 28, सिंधूनगर, परमार पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत, एलआयसी, एक्साईज आदी
अ-ओबीसी,
ब-सर्वसाधारण महिला,
क-सर्वसाधारण महिला,
ड-सर्वसाधारण
शहरातील 24 तास पाणी मिळणार हा एकमेव प्रभाग आहे. त्यामुळे 28 टक्के गळती थांबल्याचा दावा महापालिका करत आहे. शहरातील पहिला हरित सेतू प्रकल्प येथे राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पायी व सायकलवर जवळच्या बस थांब्यापर्यंत जाता येणार आहे. आकुर्डीतील रखडलेले ग. दि. माडगुळकर नाट्यगृह सुरू झाले आहे. तेथील कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अमृत योजनेत प्रभागातील जुनी ड्रेनेजलाईन काढून नव्याने टाकण्यात आली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बन स्ट्रिट डिजाईनचे काम केले आहे. सेक्टर क्रमांक 26 येथे ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आले आहे. एलआयसी कॉलनी व गंगानगर येथे काँक्रीटचे रस्ते करण्यात आले आहेत. सावरकर मंडळाच्या भवनाशेजारी सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर व दक्षिण मुखी मारुती या दोन उद्यानांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.