

आकुर्डी: आकुर्डी-निगडीमधील लोकमान्य हॉस्पिटल चौक, म्हाळसाकांत चौक, संभाजी महाराज चौकातील महाविद्यालयीन तरुणांची रॅश ड्राईव्ह, कर्कश हॉर्नचा आवाज, ट्रिपल सीट, सायलेन्सरचा त्रासदायक आवाज तसेच महाविद्यालयीन तरुणांच्या उच्छादाने शाळकरी मुले, पालक व परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर पोलिस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांकडून कारवाईची मागणी
आकुर्डी-निगडी परिसरातील मध्यवर्ती व दाट लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या म्हाळसाकांत चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, लोकमान्य हॉस्पिटल, संत ज्ञानेश्वर चौकमध्ये सातत्याने बेशिस्त वाहनचालकामुळे छोटे-मोठे अपघातांची मालिका सुरूच असते. महाविद्यालयीन तरुण व रोडरोमिओ, टवाळखोर मुलांची या परिसरामध्ये मुजोरी व दादागिरी असते. रस्त्याच्या मध्यवर्ती भागातून आडवी-तिडव्या स्वरूपात दुचाकी वाहन चालवणे, मुलींच्या जवळ जाऊन कर्कश हॉर्न वाजविणे, टवाळखोरी करणे, रस्त्यावर गर्दी करणे अशा अनेक गोष्टी सातत्याने घडताना दिसतात. यावर अटकाव घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
म्हाळसाकांत चौक व लोकमान्य हॉस्पिटल चौकालगत विविध शैक्षणिक संस्थांच्या शाळा, महाविद्यालये आहेत. शाळा व महाविद्यालय भरण्या व सुटण्याच्यावेळी विद्यार्थ्यांची गर्दी असते. स्कूलबस, रिक्षाचालक व पालकांची दुचाकी वाहने रस्त्याच्या रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेली असतात. तसेच, जवळच चौक असल्याने वाहनांची रहदारीसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयीन तरुण व टवाळखोर मुले या संधीचा फायदा घेतात. या टवाळखोर मुलांमुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघातही घडले आहेत.
शिक्षकांची हतबलता
शालेय विद्यार्थी आपल्या आजूबाजूच्या मुलांबरोबर दुचाकीवर बसून अती वेगाने बेशिस्तपणे वाहन चालवितात. यामुळे बरेच वेळा परिसरातील तरुणांच्या टोळक्यांमध्ये वादावादी व भांडणेही मोठ्या प्रमाणात होतात. मोठ्या आवाजात दादागिरीची भाषा बोलून अर्वाच्य शिव्या देणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गोष्टी शिक्षकांसमोरच घडत असतात, परंतु त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे अशा प्रसंगांवर कोण निर्बंध घालणार? असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे.
वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची मागणी
अशा प्रकारच्या घटना वारंवार नजरेसमोर घडत असल्याने त्याचे दुष्परिणाम शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यावर होतात. सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे जागृत पालकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. पोलिस प्रशासनाने किमान शाळा, महाविद्यालयांच्यावेळी गस्त घालावी. चौकांचौकात वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, जेणेकरून या टवाळखोर, रोडरोमिओ व महाविद्यालयीन तरुणांवर दहशत निर्माण होईल व वाईट घडणाऱ्या प्रसंगावरती नियंत्रण राखले जाईल. यासाठी पालक व नागरिकांकडून पोलिस व वाहतूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.