

सोमाटणे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन वास्तुत भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. संख्याबळाच्या तुलनेत राष्ट्रवादी पक्ष वरचढ असला तरी महायुतीत दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजपचा नगराध्यक्ष जनतेतून निवडून आला आहे. येत्या तीन-चार दिवसांत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पालिकेत विराजमान होतील. पण खरा तिढा आहे तो उपनगराध्यक्ष पदाचा व विविध समित्यांच्या सभापतीचा.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेत ठरल्याप्रमाणे महायुती झाली व 17 जागा राष्ट्रवादी व 11 पैकी 10 जागा भाजपच्या वाट्याला आल्या. एक अपक्ष उमेदवार निवडून आला असला तरी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या पाठिंब्याने निवडून आल्याने ती नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करू शकते. याचा अर्थ 18-10 नगरसेवक व नगराध्यक्ष भाजपचा असे घडू शकते. राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता उपनगराध्यक्ष पद व विविध समित्यांचे सभापती हे राष्ट्रवादीचेच होणार आहे. मग, हे उपनगराध्यक्ष पद कोणाला व किती कार्यकाळासाठी मिळणार, याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
तीन नावे चर्चेत
याविषयी काही जाणकारांसोबत झालेल्या चर्चेतून पहिल्या उपनगराध्यक्ष पदासाठी 3 प्रमुख नावे समोर आली आहेत. नगरसेवक संदीप शेळके यांना काही काळ नगरपालिकेच्या कामकाजाचा अनुभव आहे, दुसरे नाव नगरसेवक सुदाम शेळके हे सर्वांत जास्त मताधिक्याने निवडून आलेले आहेत व तिसरे नाव नगरसेवक संगीता खळदे यांचे आहे. संगीता खळदे यांना नगरसेवक पदासाठी मोठा संघर्ष करावा लागल्याने त्यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी हे तीन प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
21 नगरसेवक पहिल्यांदा निवडून आले
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या 28 पैकी 21 नगरसेवक हे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही कामाचा अनुभव नाही व उर्वरित 7 नगरसेवकांपैकी 4 नगरसेवक हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. त्यापैकी गणेश मोहनराव काकडे यांना पुढील 2.5 वर्षाकरिता नगराध्यक्ष पदाचा शब्द दिल्याने उर्वरित 3 नगरसेवक व राष्ट्रवादी पक्षाचे अन्य नगरसेवक यांना विविध समित्यांचे सभापतीपद मिळू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात नोंदवला जात आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी योजल्याप्रमाणे सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे वरवर जरी महायुती झाली असली, तरी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कट्टर भाजपचे नगरसेवक नगर परिषदेत असल्याची व उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा निर्णय आमदारांच्या मर्जीनेच होणार, अशी दबक्या आवाजातली चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.