

मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत चालले आहे. फुटकळपासून मोठ्या खर्चासाठी सर्रासपणे डिजिटल ऑनलाईन व्यवहार केले जात आहेत. एआयचे तंत्रज्ञानही सर्वत्र रुळले आहे. मात्र, महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आर्थिक व्यवहारासाठी केवळ रोखीची सक्ती केली जात आहे. रोख रकमेअभावी उमेदवारी अर्ज स्वीकारला जात नसल्याने इच्छुक नाराजी व्यक्त करीत आहेत. डिजिटल प्रणालीला निवडणूक यंत्रणेकडून दाखविल्या जाणार्या रेड सिग्नलमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईद्वारे केला जात आहे. संगणक प्रणालीचा अंगीकार करून पेपरलेस कारभार केला जात आहे. मालमत्ताकर, पाणीपट्टी, उद्यानातील प्रवेश तिकीट तसेच, विविध शुल्क ऑनलाईन स्वीकारले जात आहे. नागरिकांकडून चहा तसेच, भाजीपाल्याच्या बिलापासून मोठ्या खर्चिक बिलाचे पेमेंट ऑनलाईन केले जात आहे. ही सवय आता, सर्वच नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. ते व्यवहार सुरक्षित व वेगाने होत आहेत. असे व्यवहार करण्यात अशिक्षित लोकही मागे नाहीत.
डिजिटल व्यवहाराला मोठी पसंती दिली जात असली तरी, निवडणूक यंत्रणेकडून अद्याप रोखीच्या व्यवहाराची सक्ती केली जात आहे. प्रारूप व अंतिम मतदार यादीचे शुल्क ऑनलाईन न घेता रोखीने घेण्यात येत आहे. त्यावरून अनेक माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी महापालिकेच्या अधिकारी व कर्चचार्यांसोबत वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. रोख रक्कम आणण्यासाठी ऐनवेळी अनेकांना एटीएम केंद्राचा शोध घ्यावा लागला. तर, काहींना पुरेशी रक्कम रोखीने उपलब्ध न झाल्याने माघारी फिरावे लागले. रोखीच्या सक्तीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकारण्यास मंगळवार (दि.23) पासून सुरूवात झाली आहे. उमेदवारी अर्ज मोफत असले तरी, त्यासोबत देण्यात येणारी माहिती पुस्तिकेसाठी 100 रुपये शुल्क घेतले जात आहे. ती रक्कम रोखीनेच स्वीकारली जात आहे. अनुसुचित जाती (एससी), अनुसुचित जमाती (एसटी), नागरिकांचा इतर मागास वर्ग (ओबीसी) या राखीव
जागेसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांकडून 2 हजार 500 रुपये अनामत (डिपॉझिट) रक्कम घेतली जात आहे. तर, सर्वसाधारण खुल्या गटात उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांकडून 5 हजार रुपये डिपॉझिट घेतले जाते. डिपॉझिटची रक्कमही रोखीने भरणे बंधनकारक केले आहे. रोख रक्कम भरून पावती दाखविल्यानंतरच उमेदवारी अर्ज स्वीकारला जात आहे.
डिजिटल व्यवहार न करता रोखीची सक्ती केली जात असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. व्यवहारासाठी सर्वत्र डिजिटलचा वापर केला जात असताना निवडणूक विभागानेही आपली कार्यपद्धती अद्ययावत केलेली नाही. पारंपारिक पद्धतीतील रोखीने आर्थिक व्यवहार केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मतदार यादीचे एक पान- 2 रुपये
उमेदवारी अर्जासोबतची पुस्तिका- 100 रुपये
एससी, एसटी, ओबीसी जागेसाठी डिपॉझिट रक्कम- 2 हजार 500 रुपये
सर्वसाधारण खुल्या जागेसाठी डिपॉझिट रक्कम- 5 हजार रुपये
निवडणूक विभागाकडून मतदानासाठी मतपत्रिकेऐवजी ईव्हीएम मशिनचा वापर केला जात आहे. त्यामुळे मतदान व मतमोजणी प्रक्रिया अत्यंत सुलभ व गतिमान झाली आहे. त्या प्रमाणे निवडणुकीसाठी उमेदवार व इच्छुकांकडून आकारले जाणारे शुल्क हे डिजिटल ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले जावे. त्यासाठी प्रचलित डिजिटल वॉलेटचा वापर करण्याची मुभा दिली जावी, असे मत काही नाराज इच्छुकांनी व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे कामकाज केले जात आहे. त्या नियमानुसारच मतदार यादीसाठी प्रत्येक पानाचा दर हा 2 रुपये ठेवण्यात आला आहे. ते शुल्क रोखीने घेण्याबाबत निर्देश आहेत. तसेच, उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम व इतर शुल्क रोखीने स्वीकारले जात आहेत. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून अंमलबजावणी केली जात आहे. निवडणूक यंत्रणेसाठी डिजिटल प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.