

लोणावळा: लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. निकालामध्ये राष्ट्रवादी काँग््रेासचे नगराध्यक्ष मोठ्या फरकाने विजयी झाले असून, 27 पैकी 16 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने लोणावळा शहरामध्ये एक हाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आता निवडून आलेल्या 16 नगरसेवकांपैकी पहिला उपनगराध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
न.प.त 15 नवीन चेहरे
निवडून आलेल्या 16 नगरसेवकांमध्ये एक माजी नगरसेवक व 15 नवीन चेहऱ्यांना नागरिकांनी पसंती दिली आहे. या नवीन व जुन्या चेहऱ्यामधून पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाला पसंती दर्शवणार हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने हे मोठे यश संपादित केले आहे.
त्यामुळे साहजिकच आमदार सुनील शेळके सांगतील तीच व्यक्ती उपनगराध्यक्ष होणार यात तीळमात्र शंका नाही. असे असले तरी आमदार सुनील शेळके यांच्याजवळ असलेल्या अनेकांनी उपनगराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
विषय समिती सभापतीसाठी इच्छुकांची फिल्डिंग
उपनगराध्यक्ष पदासह वेगवेगळ्या समित्यांवर सभापती म्हणून वर्णी लागावी यासाठीदेखील आमदार सुनील शेळके यांच्या गाठीभेटी घेण्यास निवडून आलेल्या नगरसेवकांनी सुरुवात केली आहे. लोणावळा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाची एक हाती सत्ता आल्यामुळे सभापती पदे राष्ट्रवादी पक्षालाच जाणार आहेत.
भाजप व काँग््रेास तसेच अपक्ष यांचा प्रत्येकी एक सदस्य समित्यांमध्ये जाऊ शकतो. राष्ट्रवादीकडे बहुमत असल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा विषय समिती सभापती व उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित असले तरी कोणते नाव यामधून निश्चित केले जाणार व कोणाकोणाला पहिल्या फेरीमध्ये संधी मिळणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.