

पुणे : कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2026 रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी येत्या बुधवारी (दि.31 डिसेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत.
‘विजस्तंभ अभिवादन’ सोहळ्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या भागांतून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता बुधवारी दुपारपासून नगर रस्त्यावर वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील वाहतूकबदल एक जानेवारी 2026 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आल्याने या पुलावरून केवळ अनुनायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 8पान 2 वर येथे वाहने पार्क करता येणार विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुनायांसाठी प्रशासनाने वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहेत.
वाहने लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे - लोणीकंद येथील आपले घर, बौद्धवस्ती, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी (मोटारी, तसेच हलकी चारचाकी वाहने), आपले घरशेजारील वाहनतळ, मोनिका हॉटेलशेजारी, तुळापूर फाटा रौनक स्वीटजवळ (दुचाकी वाहने), थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, लोणीकंद आपले घर सोसायटीजवळील मोकळी जागा (बस, टेम्पो), पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मोकळे मैदान, थेऊर रस्ता, ज्ञानमुद्रा ॲकॅडमी मैदान, थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, सोमवंशी ॲकॅडमी,
शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधीमल राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीत मंतरवाडी फाटा, मरकळ पूल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरुन विश्रांतवाडीकडे जावे. तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळे फाटामार्गे नगरकडे जावे. मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जावे.
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा-पेरणे (ता. हवेली) येथे 1 जानेवारी 2026 रोजी 208 वा शौर्यदिन साजरा होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने जयस्तंभाला भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच अशोक चक्र असलेला निळा ध्वज आणि जयस्तंभाच्या सजावटीमध्ये राजमुद्रा दिसणार आहे. एकूणच कोरेगाव भीमा जयस्तंभास यावर्षी विशेष सजावट होणार आहे.
कोरेगाव भीमा शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे व रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे यांच्या विशेष प्रयत्नातून यावर्षीच्या सजावटीमध्ये जयस्तंभला पंचशीलच्या चौकटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन फोटो व दोन राजमुद्रा आणि त्यावर न्याय व स्वातंत्र्य या वाक्यासह तिरंगा ध्वज अशा स्वरूपाचा अनोखा संगम दिसणार आहे.
यामध्ये गडद निळा रंग असून तो समतेचे प्रतिक आहे, कारण आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी आजीवन समतेसाठी संघर्ष केला आणि त्यामुळे निळा रंग हा या ध्वजाचा रंग स्वीकारला गेला आहे. यंदा जयस्तंभाची सजावट करताना त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्तंभाला दिलेल्या भेटी दरम्यानचा फोटोदेखील लावण्यात येत असून आकर्षक सजावट करण्यात येत असल्याचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या वतीने सांगण्यात आले.