Latest

Bitcoin Crime : बिटकाॅईन आणि ८ लाखांच्या हव्यासापोटी पोलिसांनीच केले एकाचे अपहरण

backup backup

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टोकरन्सी असल्याच्या संशयावरून पोलिसाने साथीदारांच्या मदतीने एकाचे अपहरण केले. त्यानंतर बिटकॉइन आणि आठ लाखांची मागणी केली. वाकड पोलिसांनी आठ जणांना अटक करीत हा डाव उधळून लावला. दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी, पुणे. मुळ रा. कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यासह सुनिल राम शिंदे (रा. खारदांडा पश्चिम, मुंबई), वसंत श्यामराव चव्हाण (रा. नालासोपारा पुर्व, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसूझा (रा. कल्याण, ठाणे), मयुर महेंद्र शिर्के (रा. खार पश्चिम, मुंबई), प्रदिप काशिनाथ काटे (रा. दापोडी, पुणे), शिरीष चंद्रकांत खोत (रा. उलवे, नवी मुंबई), संजय ऊर्फ निकी राजेश बंसल (रा. उलवे, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे १४ जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (वय ३८) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी नाईक हे ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये असताना सात ते आठ अनोळखी इसमांनी त्यांचे अपहरण केले होते. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करीत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरु केले. दरम्यान, पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडून पळ काढला. आरोपींनी आपल्याकडे बिटकॉइन आणि आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार, वाकड पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली. तेथून चार जणांना ताब्यात घेत एक कार जप्त केली.

या गुन्ह्याच्या पुढील तपास अटक केलेल्या आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बंसल आणि शिरीष खोत यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच, नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले होते, असे सांगितले. दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याला भोसरी येथून सापळा लावून ताब्यात घेतले. खंदारे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा सुनियोजितपणे कट रचून केल्याचे कबूल केले. पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे एक) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे दोन) रामचंद्र घाडगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक फौजदार बिभीषण कन्हेरकर,  बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस कर्मचारी बापुसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दिपक साबळे, बंदु गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, विक्रांत चव्हाण, कल्पेश पाटील, कौंतेय खराडे, अजय फल्ले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

पोलीस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे हा पूर्वी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होता. तेथे तो सायबर विभागात काम करत असताना त्याने सेवाअंतर्गत ऑफीस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, एडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन टेक्नोलॉजी, बेसीक ऑफ हार्डवेअर एण्ड नेटवर्क इंन्फॉरमेशन, मोबाईल फॉरेन्सिक असे कोर्स केले आहेत. तसेच, सायबर क्राईम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे एकूण ३०० कोटी रुपयांची बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी असल्याची माहिती मिळाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT