पुणे : बायकोच्या हत्या प्रकरणात शिक्षा भोगलेल्या आरोपीकडून अनैतिक संबंधातून पुन्हा एका महिलेची हत्या | पुढारी

पुणे : बायकोच्या हत्या प्रकरणात शिक्षा भोगलेल्या आरोपीकडून अनैतिक संबंधातून पुन्हा एका महिलेची हत्या

आळेफाटा ; पुढारी वृत्तसेवा : पत्नीची हत्या प्रकरणात शिक्षा भोगलेल्या आरोपीने अनैतिक संबंधातून पुन्हा एक हत्या केल्याची धक्कादायक घटना रानमळा (ता. जुन्नर) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा उलगडा करण्यात आळेफाटा पोलिसांना अवघ्या एक तासात यश आले आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे.

याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष बबन मधे (वय ३८, रा. रानमळा, ता. जुन्नर, मूळ रा. केळेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव असून मृतक महिलेचे नाव सगुना गोरख केदार (वय ४०, रा. रानमळा, मूळ रा. मांडवळ वासुंदे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे आहे. आरोपी संतोष मधे हा सगुना केदार बरोबर अनैतिक संबंधातून रानमळा (जुन्नर) येथे राहत होता.

दरम्यान सगुना हिला संतोष हा वारंवार दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण करून त्रास देत होता. त्यामुळे सगुणा ही रानमळा परिसरातील एका शेताच्या कडेला राहत होती. संतोषला याचा राग आल्याने बुधवारी (दि. २) पहाटेच्या दरम्यान त्याने सगुनाच्या डोक्यात तसेच तोंडावर धारदार शस्त्राने वार करुन खून केला. अशी फिर्याद मयत सगुनाचे वडील भाऊसाहेब रखमा दुधवडे यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात बुधवारी दिली. आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह आळे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला.

पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून आरोपीला शोध सुरू केला. त्याला बेल्हेपरीसरातुन एक तासात पकडल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, रघुनाथ शिंदे, रागीणी कराळे, सहाय्यक फौजदार अंकलेश्वर भोसले, हवालदार विकास गोसावी, भिमा लोंढे, अमीत पोळ, महेश काठमोरे, मोहन आनंदगावकर, सचिन रहाने, गोरक्ष हासे, समाधान अहीवळे हे सहभागी होते.

Back to top button