नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
पेट्रोल -डिझेल दरात (Petrol and Diesel prices) आज शनिवारी (दि.२६) पुन्हा वाढ झाली. या आठवड्यातील पाच दिवसांत चारवेळा इंधन दरवाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रति लिटर ८० पैशांनी वाढ केली आहे. यामुळे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेल ३.२० रुपयांनी महागले आहे. ताज्या दरवाढीनुसार दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ९८.६१ रुपये आणि डिझेल ८९.८७ रुपयांवर पोहोचले आहे. तर मुंबईत पेट्रोल ११३.३५ रुपये आणि डिझेल ९७.५५ रुपयांवर गेले आहे. मुंबईत पेट्रोल ८४ पैशांनी आणि डिझेल ८५ पैशांनी महागले आहे.
देशात सुमारे साडेचार महिने पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झाला नव्हता. याआधी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी इंधन दरात वाढ झाली होती. त्यानंतर २२ मार्च २०२२ रोजी पेट्रोल-डिझेल दरात प्रति लिटर ८० पैसे, २३ मार्च रोजी ८० पैसे वाढ झाली होती. २४ मार्च रोजी दरात वाढ झाली नव्हती. त्यानंतर २५ मार्च रोजी पुन्हा इंधन ८० पैशांनी महागले. त्यानंतर आज शनिवारी पुन्हा त्यात ८० पैशांची वाढ झाली होती.
रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान सुरू असलेल्या युध्दामुळे जागतिक बाजारात गेल्या काही काळात क्रूड तेलाचे दर कडाडले आहेत. परिणामी इंधन दरवाढ करावी लागत असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. येत्या काही काळात इंधन दरवाढ (Petrol and Diesel prices) कायम राहण्याचे संकेतही तेल कंपन्यांनी दिले आहेत.
हे ही वाचा :