CNG-PNG Prices : पेट्रोल, डिझेलनंतर आता सीएनजी-पीएनजीसुद्धा महाग | पुढारी

CNG-PNG Prices : पेट्रोल, डिझेलनंतर आता सीएनजी-पीएनजीसुद्धा महाग

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सलग दोन दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी तिसऱ्या दिवशी गुरुवारी हे दर स्थिर ठेवले, मात्र त्याचवेळी वायू पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून सीएनजी आणि पीएनजी वायूच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

घरगुती वापराच्या पीएनजी वायूच्या दरात प्रती एससीएममागे एक रुपयांची वाढ करण्यात आली असून वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सीएनजी वायूच्या दरात ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हे वाढीव दर लागू करण्यात आले आहेत.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि गौतम बुद्धनगर येथे पीएनजीच्या दरात एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीतील पीएनजी वायूचे दर ३६.६१ रुपयांवरुन ३७.६१ रुपयांवर गेले आहेत. गौतम बुद्धनगर येथे हेच दर ३५.८६ रुपयांवर गेले आहेत. याशिवाय दिल्लीत सीएनजी वायूचे दर ५९.०१ रुपयांच्या तुलनेत ५९.५१ रुपयांवर गेले आहेत. जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांकडून आगामी काळात सीएनजी व पीएनजी दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

Back to top button