‘आम’चा ‘खास’ कसा होतो? | पुढारी

‘आम’चा ‘खास’ कसा होतो?

कोण आलं होतं हो?
आपल्या गल्लीचा ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करण्यासाठी कमिटी नेमायचीये ना! तिच्यात ‘मला अध्यक्षपद द्या’ म्हणून सांगायला कोपर्‍यावरचा लुकादादा आला होता.तो नाक्यावरचा बेवडा? शुद्धीवर तरी होता का?
असावा. तोंडाला वास येत नव्हता, हे काय कमी?
तोंडाचा वास घालवायचे एकशे एक उपाय बहुतेक पुरुषांना माहीत असतात. पण, मी म्हणते, त्याची हिम्मत कशी झाली डायरेक्ट अध्यक्षपदच मागण्याची?

त्याचा असेल चांगलं काम करण्याचा इरादा! एरव्ही शुद्धीत असताना हा फर्डी भाषणं करतो, लोकांना हसवतो. त्यावरून त्याला वाटलं असेल.
त्याला ढीग वाटेल हो! लोकांचा विश्‍वास नको बसायला? मोठ्या पदावरचा माणूस कसा खास हवा.
गेल्या वर्षीच्या महोत्सव कमिटीत तुझ्या मैत्रिणीचा नवरा होताच की! पद कुठलं महाशयांचं? खजिनदाराचं! कर्तबगारी कोणती? तर पैशाची अफरातफर केल्याच्या संशयावरून नोकरीवरून कमी केल्याची.

एवढी काही लटपट केली नसणार हो त्यांनी! नोकरीमध्ये कंपनीचं तळं राखणारे बरेच लोक थोडं-फार पाणी चाखतातच. तसं करणारे ते काही एकटे नसणार.
बघ, मैत्रिणीचा नवरा म्हटल्याबरोबर कशी सारवासारव करायला लागलीस ती! तो लुकादादा सरळसरळ तरी गुंड आहे. एरव्ही पांढरपेशा पोषाखातले लफडेबाज काय कमी आहेत आपल्याकडे?
त्यांची पापं राहू देत त्यांच्याकडे. त्यांनी जबाबदारीची, नेतेपणाची पदं तरी भूषवू नयेत. त्यांनी ढीग मागितली, तरी आपण देऊ नयेत, एवढंच माझं म्हणणं आहे.

एकूण आपल्यातले आम आदमी अचानक खास होऊ नयेत, असं वाटतंय ना तुला? मलाही असंच वाटायचं; पण तिकडे आम आदमी पक्षाने भगवंत मान मुख्यमंत्री झाल्याने मला फेरविचार करणं भाग पडतंय.
का? हे मान तितकेसे माननीय नाहीत का?
ते मूळचे कॉमेडियन. उगाच इकडचे, तिकडचे पाणचट जोक सांगून हसवायचे. आता मुख्यमंत्रिपदावरून कुठले जोक सांगणार पठ्ठ्या?
पण, त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा विनोद सुचला कोणाला?

केजरीवाल साहेबांना. मानसाहेबांंनी म्हणे राजकारण गाजवण्यासाठी महिनाभरापासून दारूला स्पर्शही केला नाहीये, एवढा त्याग कोणी कोणासाठी करतं का? या त्यागाचं बक्षीस म्हणून जनतेनं त्यांना निवडून द्यावं वगैरे भावनिक आवाहन केलं म्हणे!
या न्यायाने उद्या लुकादादाही म्हणेल, ‘मी महिनाभर सगळी लफडी बंद ठेवलीयेत. या त्यागासाठी तरी मला ही जबाबदारी पेलू द्यावी.’
थोडं चुकत्येस प्रिये. आम आदमीची अशी भलावण कोणातरी खास व्यक्‍तीने करायला हवी, तरच तिला वजन येणार. तिकडे एक केजरीवाल मानसाहेबांचे वाली ठरले, लगेच लोकांना तो भगवंताचा आदेश वाटला. तसा इकडे एखाद्या खास माणसाचा म्हणजे माझा वरदहस्त मिळाला की, आपलं काम हातोहात होईल, असं वाटलं असेल लुकादादाला. आता माझीच थोरवी माझ्या तोंडून वदवून घेणार का?

नको नको. त्यापेक्षा तुम्हीच तुमची पैसा पॉईंट रमी, सिगारेट, दारू, थापेबाजी वगैरे महिनाभरासाठी बंद करा बरं! खात्यावर असा त्याग पडला की, लोक मागचं विसरतील की, लगेच कोणा पुढार्‍याच्या वरदहस्ताने तुम्ही ‘आम’चे ‘खास’ झालाच म्हणून समजा!

– झटका

Back to top button