Mariupol theatre : रशियाच्या बॉम्बहल्ल्यानंतर मारियुपोलच्या थिएटरमध्ये ३०० मृतांचा खच?, युक्रेनकडून भिती व्यक्त | पुढारी

Mariupol theatre : रशियाच्या बॉम्बहल्ल्यानंतर मारियुपोलच्या थिएटरमध्ये ३०० मृतांचा खच?, युक्रेनकडून भिती व्यक्त

कीव्ह; पुढारी ऑनलाईन

रशियाचे युक्रेनवर आक्रमकपणे हल्ले सुरुच आहेत. मारियुपोल या बंदराच्या शहरातील एका थिएटरवर (Mariupol theatre Ukraine) झालेल्या बॉम्बहल्ल्यात सुमारे ३०० नागरिक ठार झाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या थिएटरवर रशियन सैन्याने एअर स्ट्राइक केला होता. याबाबत मारियुपोल शहरातील युक्रेनियन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, थिएटरमध्ये शेकडो लोकांनी आश्रय घेतला होता. पण रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यात यातील सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची भिती आहे.

“प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रशियन विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यानंतर मारियुपोलच्या ड्रामा थिएटरमध्ये सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे,” असे मारियुपोल सिटी हॉलने (Mariupol city hall) टेलिग्रामवर (Telegram) लिहिले आहे.

आतापर्यंत, मृतांचा निश्चित आकडा पुढे आलेला नाही. उद्ध्वस्त इमारतीचा ढिगारा आणि सततच्या गोळीबारामुळे जीवितहानीची माहिती घेणे अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रशियाने केलेल्या हल्ल्यात थिएटरमध्ये आश्रय घेतलेल्या शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात शहरातील या थिएटरवर हल्ला करण्यात आला होता. ज्यावेळी थिएटरवर हल्ला झाला त्यावेळी आत मोठ्या संख्येने लोक होते.

सिटी कौन्सिलच्या (city council) अंदाजानुसार तसेच बीबीसी आणि ह्युमन राइट्स वॉच गटाने (Human Rights Watch campaign group) घेतलेल्या नागरिकांच्या मुलाखतीनुसार, हल्ल्याच्या काही दिवस आधी या थिएटर इमारतीमध्ये (Mariupol theatre Ukraine) ५०० ते १ हजार लोकांनी आश्रय घेतला होता.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine war) २९ व्या दिवशी युक्रेनने रशियाचे जहाज ‘ओर्स्क’ उद्ध्वस्त केले. या जहाजातून मारियुपोल येथील रशियन सैनिकांना शस्त्रास्त्रे पोहोचविली जात होती. दरम्यान, रशियन सैनिकांनी युक्रेनच्या इज्युम या शहरावर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे.

युद्धाबाबत फेक न्यूज प्रसारित केल्यावरून रशियाने गुगलच्या न्यूज सेवेवर बंदी घातली आहे, तर ‘नाटो’ने युद्धात आतापर्यंत १५ हजार रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. रशियाने दोन मार्चनंतर मृत सैनिकांची अधिकृत आकडेवारी जारी केलेली नाही. २ मार्चपर्यंत ५०० सैनिक मारले गेल्याचे रशियाने म्हटले होते.

 

Back to top button