चंदीगड : वृत्तसंस्था
फिरोजपूर येथे सीमा सुरक्षा दलाने सतलज नदीतून एक पाकिस्तानी नाव जप्त केली आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जेथे ताटकळला, त्या जागेपासून नाव सापडली ते ठिकाण अवघ्या 50 किलोमीटरवर आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून सुरक्षा, तपास, गुप्तचर यंत्रणा अॅलर्टवर आहेत.
नाव येथे केव्हा आली. नावेत कोण लोक होते आणि नाव इथे येण्यामागचा हेतू काय होता, याचा शोध गुप्तचर तसेच तपास यंत्रणा घेत आहेत. नाव अगदी त्या ठिकाणी जप्त करण्यात आली, जेथून सतलज नदी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करते. सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
पाकिस्तानातून काही दहशतवादी तर भारतीय हद्दीत शिरले नाहीत, या अंगानेही तपास केला जात आहे. तथापि, अद्याप कुठलेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. ड्रग्ज आणि शस्त्रे भारतीय हद्दीत रवाना करण्याचा एक भाग म्हणूनही या नावेकडे पाहिले जात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. याआधी 2018 मध्येही अशी नाव याच ठिकाणी आढळली होती, हे येथे उल्लेखनीय! फिरोजपूर जिल्हा पाकिस्तानला लागून असल्यामुळे विशेष संवेदनशील आहे. टिफिन बॉम्ब, हँड ग्रेेनेड, स्फोटके आढळणे येथे सामान्य बाब आहे.
हेही वाचलत का?