Advice for working women
मुंबई : करिअर, मातृत्व आणि समाजसेवा या तिन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणाऱ्या श्लोका मेहता-अंबानी यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेरणा आणि मूल्यांविषयी मनमोकळा संवाद साधला आहे. देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यांपैकी एक असलेल्या अंबानी कुटुंबाची सून असूनही, त्यांनी केवळ ऐषारामाचे जीवन न निवडता समाजकार्यात स्वतःला झोकून दिले आहे. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी आई म्हणून आपली जबाबदारी आणि कामाप्रती असलेले ध्येय यात कसा समतोल साधतात, हे सांगितले.
'वर्किंग मॉम' या संकल्पनेला श्लोका यांनी स्वतःची एक वेगळी आणि सकारात्मक ओळख दिली आहे. त्या आपल्या मुलांना समजावून सांगतात, "जसे तुम्ही शाळेत जाता, तशीच मम्माला ऑफिसला जावे लागते." त्यांच्यामते, जबाबदारी आणि प्रगती या गोष्टी वय किंवा तुम्ही स्त्री आहे का पुरूष यावर अवलंबून नसतात, हे मुलांनी लहानपणापासूनच शिकणे महत्त्वाचे आहे.
त्या पुढे सांगतात की, यश म्हणजे केवळ मोठे पद किंवा मोठे लक्ष्य गाठणे नाही, तर एका ध्येयाने प्रेरित होऊन काम करणे आहे. "प्रत्येक करिअरचे स्वतःचे महत्त्व असते. जर तुमचा तुमच्या कामावर विश्वास असेल, तर ते ध्येय हळूहळू पूर्णत्वास नेण्यात काहीच गैर नाही," असे त्यांचे मत आहे.
समाजासाठी काहीतरी ठोस करण्याच्या उद्देशाने श्लोका यांनी २०१४ मध्ये त्यांची बालपणीची मैत्रीण मनीती शाह यांच्यासोबत 'कनेक्टफॉर' (ConnectFor) या संस्थेची स्थापना केली. हे एक असे व्यासपीठ आहे, जे स्वयंसेवा करू इच्छिणाऱ्या लोकांना आणि कंपन्यांना देशभरातील स्वयंसेवी संस्थांशी (NGOs) जोडते. आजपर्यंत या व्यासपीठाच्या माध्यमातून: लाखो तासांचे स्वयंसेवा कार्य पूर्ण झाले आहे, १हजारांहून अधिक स्वयंसेवी संस्थांना मदत मिळाली आहे. श्लोका मानतात की, ही केवळ सुरुवात आहे. त्यांच्यामते, "शासकीय योजनांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे हे पहिले पाऊल असते, पण खरा बदल हा त्या सुविधांची देखभाल, शिक्षण आणि लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणल्यानेच येतो."
श्लोका यांनी वारसा (Legacy) या संकल्पनेवर अतिशय मार्मिक भाष्य केले. त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी वारसा म्हणजे तुम्ही मृत्यूपत्रात काय सोडता ते नाही, तर तुम्ही लोकांमध्ये काय रुजवता ते आहे. मग ती तुमची मुले असोत, एखादा स्वयंसेवक किंवा सहकारी जर तुम्ही कोणाच्यातरी विचारांना सकारात्मक दिशा दिली असेल, तर तोच तुमचा खरा वारसा आहे."
या प्रवासात त्यांना त्यांचे कुटुंबीय, विशेषतः पती आकाश अंबानी यांचा खंबीर पाठिंबा मिळाल्याचेही त्या सांगतात. "आमच्या कुटुंबाने केवळ आम्हाला साथ दिली नाही, तर त्यांना आमच्या कामाचा अभिमानही वाटतो. त्यांनी आमच्या कामावर दाखवलेला विश्वासच आम्हाला पुढे घेऊन जातो," असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
श्लोका अंबानी यांची कहाणी ही प्रामाणिकपणा, ध्येय आणि मूल्यांवर आधारित आहे. मातृत्व, व्यावसायिक जीवन आणि समाजसेवा या तिन्ही गोष्टी एकाच वेळी जगणे शक्य आहे, हाच संदेश त्या आपल्या कार्यातून देतात. जेव्हा आजच्या जगात वर्क-लाइफ बॅलन्स एक आव्हान वाटते, तेव्हा श्लोका अंबानी आठवण करून देतात की, जर तुमचा हेतू स्पष्ट असेल आणि ध्येय निश्चित असेल, तर सर्व काही एकत्र साधणे शक्य आहे.